कल्याणमध्ये स्वामींचा प्रकटदिन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न
By सचिन सागरे | Published: April 10, 2024 07:06 PM2024-04-10T19:06:55+5:302024-04-10T19:07:21+5:30
पश्चिमेकडील पारनाका येथील केंद्रात बाल विकास कार्यशाळा, हितगुज आदींसह सामुहिक स्वामीचरित्र सारामृतचे पठण करण्यात आले.
कल्याण : ‘श्री स्वामी समर्थ, जयजय स्वामी समर्थ’चा जयघोष करीत पूर्व आणि पश्चिम परिसरात स्वामींचा प्रकट दिन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. बिर्ला कॉलेज रोडलगत असलेल्या श्री स्वामी समर्थ चौकातील केंद्र, फॉरेस्ट कॉलनी, खडकपाडा, रामबाग, काळातलाव, गोदरेज हिल तसेच पूर्वेकडील कोळशेवाडी, गणेश नगर आदी अनेक ठिकाणी स्वामींच्या मठात आणि केंद्रात भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
पश्चिमेकडील पारनाका येथील केंद्रात बाल विकास कार्यशाळा, हितगुज आदींसह सामुहिक स्वामीचरित्र सारामृतचे पठण करण्यात आले. सेवेकरी स्वाती पाचघरे यांनी बालसंस्कार वर्ग आणि श्री स्वामी चरित्र सारामृत पठण, श्री गुरुचरित्र पारायण, श्री नवनाथ पारायण अशा विविध अध्यात्मिक सेवांची माहिती भक्तांनी दिली. या केंद्राला एक वर्ष पूर्ण झाल्याने पहिला वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या केंद्राच्या माध्यमातून वर्षभरात आध्यात्मिक सेवांबरोबरच सामाजिक उपक्रमदेखील घेण्यात आले. मोफत आरोग्य शिबिरे, भव्य रक्तदान शिबिरे, योग शिबिरे, विद्यार्थ्यांना वह्या वाटप, आदिवासी पाड्यांवर व कुष्ठरोग वसाहतीत अन्नदान व वस्त्रदान असे विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आले.
स्वामी समर्थ चौकातील केंद्रात सामुहिक पारायण आणि सामुहिक स्वामीचरीत्र सारामृतचे पठण करण्यात आले. फॉरेस्ट कॉलनीमधील सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टच्या वतीने पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता.