जुन्या पेन्शनसाठी लाक्षणिक उपोषण; कर्मचारी घेणार कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदेंची भेट
By प्रशांत माने | Published: June 5, 2024 05:19 PM2024-06-05T17:19:15+5:302024-06-05T17:20:41+5:30
२३ मे १९९९ रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाला सुरुवात झाली
प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: केडीएमसीतील परिवहन उपक्रमातील कर्मचा-यांना जुनी पेन्शन लागू करा, असे आदेश राज्य सरकारने जानेवारीमध्ये दिले आहेत. परंतु या आदेशाची अंमलबजावणी केडीएमसीकडून होत नसल्याने महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना आता लाक्षणिक उपोषण छेडणार आहे. १३ जूनला गुरुवारी केडीएमसीच्या मुख्यालयाबाहेर हे आंदोलन छेडले जाणार आहे अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष महेश पाटील यांनी दिली.
२३ मे १९९९ रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाला सुरुवात झाली. गेली पंचवीस वर्षे ना नफा ना तोटा या तत्त्वावर हा उपक्रम चालत आलेला आहे. परिवहन उपक्रमाला महाराष्ट्र शासनाची भविष्य निर्वाह निधी निवृत्ती वेतन १९८२ जुनी पेन्शन योजना लावणे अभिप्रेत होते. परंतु तत्कालीन परिवहन व्यवस्थापक यांनी केंद्र शासनाची अंशदायी भविष्य निर्वाह निधी योजना कोणत्याही समितीचा ठराव न घेता आपल्या मनमानी कारभाराने परिवहन कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर रित्या लावल्याचा आरोप संघटनेने केला आहे. परिवहन कर्मचारी हे १९९९ ते २००५ या कालावधीत भरती झालेले आहेत. जुनी पेन्शन संदर्भात महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेने वारंवार प्रशासनाशी पत्रव्यवहार केला परंतु न्याय न मिळाल्यामुळे संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे निवृत्तीवेतन नियम १९८२ जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु याची अंमलबजावणी प्रशासनाने केलेली नाही याकडे संघटनेने लक्ष वेधले आहे. जुनी पेन्शन योजनेची अंमलबजावणी होणे बाबत येत्या दोन दिवसात याबाबत खासदार शिंदे यांची भेट घेतली जाणार असल्याची माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष अनिल पंडित व उपाध्यक्ष आकाश शितकर यांनी दिली.