Lata Mangeshkar: त्या 500 च्या नोटा जुन्या झाल्या, पण आजही आहेत लाखमोलाच्या; लतादीदींना २५ वर्षे दिली कल्याणच्या तबलावादकाने साथ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 05:45 PM2022-02-06T17:45:24+5:302022-02-06T17:47:18+5:30

Lata Mangeshkar: कल्याणमधील एका तबलावादक कलाकारालाही तब्बल 25 वर्ष  लतादीदींचा सहवास लाभला आहे. इतकंच नाही तर त्यांचं तबलावादन ऐकून खुद्द लता दिदींनीही त्यांना रोख रक्कम देऊन कौतुकाची थाप दिली होती. 

tabla player Ashok Kadam of Kalyan got 5000 rs award from Lata Mangeshkar | Lata Mangeshkar: त्या 500 च्या नोटा जुन्या झाल्या, पण आजही आहेत लाखमोलाच्या; लतादीदींना २५ वर्षे दिली कल्याणच्या तबलावादकाने साथ

Lata Mangeshkar: त्या 500 च्या नोटा जुन्या झाल्या, पण आजही आहेत लाखमोलाच्या; लतादीदींना २५ वर्षे दिली कल्याणच्या तबलावादकाने साथ

Next

- मयुरी चव्हाण

लोकमत न्यूज नेटवर्क : कल्याण 

 गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानं संपूर्ण देश शोकाकूल झाला आहे. अनेक दिग्गजांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला तर अनेकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्यात. अनेक कलाकारांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून दिदींचा सहवास लाभला. हे कलाकारही आज दिदींच्या जाण्यानं भावुक झाले आहेत. कल्याणमधील एका तबलावादक कलाकारालाही तब्बल 25 वर्ष  लतादीदींचा सहवास लाभला आहे. इतकंच नाही तर त्यांचं तबलावादन ऐकून खुद्द लता दिदींनीही त्यांना रोख रक्कम देऊन कौतुकाची थाप दिली होती. 

 कल्याण पश्चिमेत खडकपाडा परिसरात राहणारे अशोक कदम हे उत्तम तबलावादक आहेत. 25 वर्ष त्यांनी लतादिदींसोबत राज्यासह इतर देशातही अनेक कार्यक्रम केले. आपल्या तबलावादनानं त्यांनी प्रेक्षकांची तर वाहवा मिळवलीच पण पुण्यातील एका कार्यक्रमात या कल्याणकर  कलाकारानं दिदींच मनही जिंकलं. 2006 साली पुण्यातील एका कार्यक्रमात अशोक कदम यांनी तबलावादन केलं. त्यांच वादनाने सर्व प्रेक्षक भारावून गेले. कदम यांच कौतुक करण्याचा मोह लतादिदींनाही आवरला नाही. त्या सुद्धा प्रेक्षकांममध्ये बसून कार्यक्रमाचा आनंद घेत होत्या. कार्यक्रम झाल्यावर त्यांनी 5 हजार रुपये बक्षीस म्हणून कदम यांना दिले. ही आठवण आजही कदम यांनी जपून ठेवली आहे. दिदींनी दिलेला बक्षीसरुपी आशीर्वाद मला दिला हे मी माझे भाग्य समजतो अशा भावना कदम यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केल्या आहेत. 

1993 साली पं हृदयनाथजी मंगेशकर यांच्या  भावसरगम या कार्यक्रमात अशोक कदम यांची दिदींसोबत पहिली भेट झाली. त्यानंतर 1998 साली अमेरिका बोस्टन या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमातही दिदींच्या गाण्यावर तबला वादन करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यानंतर अनेक वर्षे कदम यांनी दिदींसोबत तबला ढोलकीची साथसंगत केली. दिदींच्या जाण्याने कदम यांनीही शोक व्यक्त केला. 

रियाजासाठी मी अनेकदा दिदींच्या घरी जात होतो. सराव असो किंवा कार्यक्रम त्या नेहमी माझ्या जेवणाची विचारपूस करायच्या. दरवर्षी गणपतीमध्ये मला जेवणाचं निमंत्रण असायचं आणि मी दरवर्षी जायचो. अशा खूप आठवणी आहे पण साक्षात गानसम्राज्ञी दिदींनी मला बक्षीस देणं ही आठवण काही विशेषच आहे. एक शुभेच्छापत्रही त्यांनी मला दिलंय. 
- अशोक कदम, कलाकार,कल्याण

Web Title: tabla player Ashok Kadam of Kalyan got 5000 rs award from Lata Mangeshkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.