आत्मविश्वासासह पहिलं पाऊल पडावे आणि विविध कौशल्य विकसित व्हावेत!
By प्रशांत माने | Published: June 21, 2024 08:49 PM2024-06-21T20:49:57+5:302024-06-21T20:50:42+5:30
केडीएमसीच्या शाळांमध्ये पूर्व तयारी मेळावे
कल्याण: इयत्ता१ ली मध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्य विकसित व्हावेत आणि आत्मविश्वासासह शाळेत पहीले पाऊल पडावे या दृष्टीकोनातून केडीएमसीच्या सर्व शाळांमध्ये पूर्व तयारी मेळाव्याचे शुक्रवारी आयोजन केले होते. या मेळाव्यात सीआरसी प्रमुख, मुख्याध्यापक, लोकप्रतिनिधी, शिक्षक, बालवाडी शिक्षिका, पालक, स्वयंसेवक आदिंनी सक्रीय सहभाग घेतला होता.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रहाटोली, ठाणे व कल्याण डोंबिवली मनपा शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मनपा शाळांमध्ये आयोजत केलेले शाळा पूर्व तयारी मेळावे महापालिका प्रशासन अधिकारी रंजना राव व शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या विविध कलाकृती पूर्ण करण्यासाठी स्टॉल लावण्यात आले.
त्यात शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक विकास, भाषिक विकास विकसित व्हावे या उद्देशाने हे स्टॉल लावण्यात आले होते. सर्व स्टॉलवर विद्यार्थ्यांनी कृतीतून सहभाग घेतला. शाळापूर्व तथा मनपा समन्वयक म्हणून विषयतज्ञ राजाभाऊ शेप यांनी कामकाज सांभाळले. या मेळाव्यानंतर सर्व शिक्षक, पालक व बालकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.