Tauktae Cyclone: तौक्ते वादळाचा फटका शेतमालाला, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची ४० टक्के कमी आवक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 04:24 PM2021-05-18T16:24:20+5:302021-05-18T16:29:44+5:30
नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती असा कल्याण बाजार समितीचा नावलौकीक आहे.
कल्याण-तौक्ते वादळाचा फटका शेतमालास बसला आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत आज ४० टक्के कमी शेतमालाची आवाक झाली आहे. त्यात वीज पुरवठा खंडीत असल्याने आलेला शेतमाल व्यापारी वर्गाला विकण्यात अडचणी आल्या. फासरा मालही विकला गेला नाही.
नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती असा कल्याण बाजार समितीचा नावलौकीक आहे. या बाजार समितीत कालच्या तारखेत ३ हजार २५४ क्विंटल फळ आणि भाजी पाल्याचा माल आला होता. काल तौक्ते वादळामुळे आज पहाटे बाजारात फळ आणि भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. आजच्या तारखेत केवळ १ हजार २३४ क्विंटल इतकाच फळ आणि भाजीपाला आला. पुणे, जुन्नर, नाशिक या भागातून कल्याण बाजार समितीत शेतमाल येतो. त्याचबरोबर गुजरात आणि राज्यस्थान आणि मध्य प्रदेशातून शेतमाल येतो. काल वादळी वाऱ्याचा तडाखा बसल्याने शेतमालाची वाहतू करणारे शेतमालाचे ट्रक टेम्पो कल्याणपर्यंत पोहचू शकले नाही. कांदा बटाट्याची वाहतू करणारे टेम्पो ट्रक गुजरात आणि राजस्थानमधून आले होते.
मात्र ते कालच्या तारखेत कल्याणमध्ये दाखल झाले होते. आज शेतमालाची आवक वादळी वाऱ्यामुळे झालेली नाही. फळ आणि भाजीपालाप्रमाणोच कांदाच्या आवक ९६० क्विंटल, बटाट्याची आवक १६३५ क्विंटल आणि अन्नधान्याची आवाक १ हजार ६६० क्विंटल इतकी झाली आहे. कालच्या तारखेत कांद्याची आवक २ हजार ६५८ क्विंटल, बटाट्याची आवक १ हजार ३६० क्विंटल आणि अन्नधान्याची आवाक ९७४ क्विंटल इतकी झाली आहे.
कोरोनामुळे केवळ अत्यावश्यक बाब म्हणून कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजार सुरू ठेवण्यात आला आहे. तसेच दर रविवारी बाजार समिती बंद ठेवली जाते. कोरोनामुळे बाजारातील व्यापारी वर्गास फटका सहन करावा लागत असताना आत्ता तौक्ते वादळी वाऱ्यांचाही फटका बाजार समितीला सहन करावा लागला असल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्यामकांत चौधरी यांनी सांगितले की, तौक्ते वादळी वाऱ्याचा फटका बाजार समितीला बसला आहे. बाजार समितीत शेतमालाची आवाक ४० टक्के कमी झाली आहे. त्यात बाजार समितीचा वीज पुरवठा खंडीत असल्याने व्यापाऱ्यांना व्यापार करता आलेला नाही. फार कमी प्रमाणात मालाला उठाव होता.