तिकीट विचारल्याने टीसीला केली मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 10:42 AM2022-07-25T10:42:24+5:302022-07-25T10:42:49+5:30
गुप्ता हे विदर्भ एक्स्प्रेसमध्ये टीसी म्हणून कर्तव्यावर होते. मुंबईहून ही गाडी कल्याणकडे जात असताना प्रत्येक डब्यातील प्रवाशाचे तिकीट ते तपासत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : गोंदियाकडे जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसमधील एका प्रवाशाने टीसीला मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. टीसीने प्रवाशाला तिकीट विचारल्यावर दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. यावेळी प्रवाशाने टीसीला शिवीगाळ करीत मारहाण केली. याप्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी विजयन पेरूमल (३४, रा. कल्याण) या प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल केला आहे, तर राजेशकुमार गुप्ता (४२), असे मारहाण झालेल्या टीसीचे नाव आहे.
गुप्ता हे विदर्भ एक्स्प्रेसमध्ये टीसी म्हणून कर्तव्यावर होते. मुंबईहून ही गाडी कल्याणकडे जात असताना प्रत्येक डब्यातील प्रवाशाचे तिकीट ते तपासत होते. डोंबिवली स्थानकातून गाडी कल्याणच्या दिशेने जात असताना पेरूमल याला गुप्ता यांनी तिकीट विचारले. त्यावेळी पेरूमल याने माझ्याकडे तिकीट होते. मात्र, ते हरवल्याचे गुप्ता यांना सांगितले. त्यामुळे त्यांनी पेरूमल यास दंड भरण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने त्याने गुप्ता यांना शिवीगाळ करून मारहाण केली. त्यावेळी इतर प्रवाशांनी मध्यस्थी करीत मारहाणीचा प्रकार रोखला. गाडी कल्याण स्थानकात थांबून काही वेळातच पुढील प्रवासास निघाली.
डोबिंवली पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग
याप्रकरणी गुप्ता यांनी मनमाड लोहमार्ग पोलीस ठाण्यात पेरूमलविरोधात तक्रार दिली. मात्र, मारहाणीचा प्रकार डोंबिवली लोहमार्ग पोलिसांचा हद्दीत घडल्याने हा गुन्हा त्यांनी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला. या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.