विद्यार्थी, शिक्षकांसाठी प्रभावी शिक्षण प्रणाली विकसित करणार; ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे प्रतिपादन
By मुरलीधर भवार | Published: February 13, 2023 07:51 PM2023-02-13T19:51:45+5:302023-02-13T19:52:25+5:30
विद्यार्थी, शिक्षकांसाठी प्रभावी शिक्षण प्रणाली विकसित करणार असे आश्वासन शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिले.
कल्याण: जुनी पेन्शन योजना लागू करणारच, त्याचबरोबर शिक्षक आमदार म्हणून शिक्षक, विद्यार्थी व शैक्षणिक संस्था यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणार असल्याची हमी कोकण शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी येथे दिली.
गाेवेली येथील जीवनदीप महाविद्यालयात हा जीवनदीप पुरस्कार वितरण साेहळ्यास आमदार म्हात्रे उपस्थित हाेते. याप्रसंगी त्यांनी उपराेक्त हमी दिली. यावेळी भाजप आमदार किसन कथोरे, निरंजन डावखरे, संस्था अध्यक्ष रवींद्र घोडविंदे आदी मान्यवर उपस्थित हाेते. मान्यवरांच्या हस्ते आमदार म्हात्रे यांचा सत्कार करण्यात आला. आमदार म्हात्रे यांनी सांगितले की, शिक्षण व्यवस्थेतील बारकावे आणि बदलांविषयी उपस्थित शिक्षकांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत बदल करून प्रभावी शिक्षण व्यवस्था तयार करणार आहे.
जीवनदीप शिक्षकरत्न पुरस्कारासाठी शंभरहून अधिक अर्ज मिळाले होते. त्यातील २३ शिक्षकांची शिक्षकरत्न पुरस्कारासाठी निवड केली. यामध्ये सिद्धप्पा शिंदे, प्रमिला पवार, शलाका नागवेकर, अर्जुन माचिवले, रामराव पवार, आडेप किसनराव, दीप्ती यादव, ज्योती सानये, ललिता माेरे, दत्ता लोणारे, वैशाली रोहणे, सुप्रिया नायकर, वैभवी तरटे, अर्चना मोहिते, कल्पेश शिंदे, रतिलाल बाबेल, दीनानाथ पाटील, यशवंत महाजन, सुभाष यादव सरोदे, प्रशांत माळी, आनंद मेहेर, हेमंत झुंझारराव, अजय जिरापुरे यांना शिक्षकरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.