कोरोना चाचणीसाठी शिक्षकांची झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 01:34 AM2020-11-21T01:34:32+5:302020-11-21T01:34:46+5:30
वसंत व्हॅली केंद्र : सेंटरचालकांची तारांबळ, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
n लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : राज्यात इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सोमवारपासून सुरू होत असून, शिक्षकांना कोरोना चाचणी सक्तीची केली आहे. त्यामुळे केडीएमसी हद्दीतील शिक्षक चाचणीसाठी सेंटरवर पोहोचले असता तेथे झुंबड उडाल्याचे दिसून आले. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. तसेच सेंटरचालकांची तारांबळ उडाली. तर, अनेक शिक्षक चाचणी न करताच घरी परतले. मनपा प्रशासनाचे नियोजन नसल्याने शिक्षकांना मनस्ताप सहन करावा लागला.
कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याशिवाय शिक्षकांना शाळेत हजर केले जाणार नाही. त्यामुळे पश्चिमेतील वसंत व्हॅलीतील सेंटरवर चाचणीसाठी २०० शिक्षकांनी शुक्रवारी सकाळी ७ पासून रांग लावली. मात्र, सेंटरचालक व कर्मचारी ११ वाजता आले. तेथील भली मोठी रांग पाहून त्यांची तारांबळ उडाली. एकेका सेंटरवर दिवसाला फक्त १०० शिक्षकांची चाचणी होऊ शकते. त्यामुळे सर्वच शिक्षकांची चाचणी कशी करणार, असा पेच सेंटरचालकांपुढे उभा ठाकला. गुरुवारीही या सेंटरवर चाचणी न झाल्याने १५० शिक्षकांना घरी परतावे लागले होते. दरम्यान, कोरोनाच्या चाचणीसाठी शिक्षकांकडे केवळ आता दोनच दिवस असून, चाचणी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान केली जाणार आहे.
दरम्यान, एका शिक्षिकेने सांगितले की, आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल उशिरा मिळतो. त्यामुळे शिक्षक सोमवारी शाळेत कसे हजर होणार, याविषयी साशंकता आहे. कोरोना चाचणीच्या नियोजनाच्या अभावाचा फटका शिक्षकांना बसला आहे.
जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात शिक्षकांनी प्रथम थर्मल स्कॅनिंग करावे. त्यात तापमान जास्त आढळल्यास अगोदर ॲण्टीजेन मग आरटीपीसीआर चाचणी करावी. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यास तो शाळा व्यवस्थापनास सादर करून मगच शाळेत हजर व्हावे, असे म्हटले आहे. याच पद्धतीने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढण्यास काय हरकत होती?
- शेखर कुलकर्णी, शिक्षक
येथे करता येईल चाचणी
केडीएमसीने कल्याण पश्चिमेतील रुक्मिणीबाई रुग्णालय, वसंत व्हॅली, शहाड येथील साई निर्वाणा, डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालय आणि विद्यानिकेतन शाळा येथे चाचणीची केंद्रे सुरू केली आहेत.