तुम्हीच सांगा.. आम्ही "वर्क फ्रॉम होम" करायचे कसे? साचलेल्या पाण्यामुळे नोकरीवर पाणी फिरण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 03:35 PM2021-07-29T15:35:12+5:302021-07-29T15:36:09+5:30
KDMC News: राज्यात इतर शहरांप्रमाणे कल्याण डोंबिवली शहरात सुद्धा पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, थोडा जरी पाऊस पडला तरी, डोंबिवलीतील नांदीवली हा परिसर लागलीच जलमय होतो. वारंवार या ठिकाणी पाणी साचत असल्याने येथील नागरिक मेटाकुटीला आले आहेत.
डोंबिवली - राज्यात इतर शहरांप्रमाणे कल्याण डोंबिवली शहरात सुद्धा पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, थोडा जरी पाऊस पडला तरी, डोंबिवलीतील नांदीवली हा परिसर लागलीच जलमय होतो. वारंवार या ठिकाणी पाणी साचत असल्याने येथील नागरिक मेटाकुटीला आले आहेत.
पावसाळ्यात दरवर्षी पाणी साचून निर्माण होणाऱ्या विविध समस्यांना कंटाळून डोंबिवली पूर्वेच्या नांदीवली भागातील रहिवाशांनी केडीएमसी प्रशासनाविरोधात आज ठिय्या आंदोलन केले. यामध्ये अनेक महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी पाणी साचल्यानं वीजपुरवठा वारंवार बंद करण्यात येतो. त्यामुळे आम्ही वर्क फ्रॉम होम करायचे तरी कसे? असा सवाल येथील संतप्त नागरीकांनी उपस्थित केला आहे. साचलेल्या पाण्यामुळे ऐन कोरोना काळात नोकरीवरच पाणी फिरण्याची वेळ आली असल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहे. (tell us .. how do we do "work from home"? Time to turn the water on the job due to stagnant water)
नांदीवली भागात यंदा पावसाने चांगलीच दाणादाण उडवून दिली. याठिकाणी असा कोणताही एक परिसर नव्हता ज्याठिकाणी पाणी साचले नव्हते. स्वामी समर्थ मठ परिसरातील रस्त्यावर तर गुडघाभर पाणी साचलेले होते. परिणामी इथला वीज पुरवठाही खंडीत झाल्याने याठिकाणचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. गेल्या काही वर्षांपासून या परिसरात पाण्याची समस्या निर्माण होत असून पालिका प्रशासनाकडे याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही त्यात काही सुधारणा झाली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सध्या अनेकांचे कार्यालयीन कामकाज घरूनच सुरू आहे. मात्र थोडा पाऊस पडला तरी नांदीवली परिसर जलमय होतो. परिणामी वीजपुरवठा खंडित केला जातो. या सर्वांचा परिणाम घरातून काम करणाऱ्या नागरिकांच्या नोकरीवर होत आहे.
पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी सर्वोदय पार्क ते नांदीवली नाला येथे दोन्ही बाजुंनी गटारे बांधणे, तुंबलेल्या गटारांची साफसफाई करणे, ज्या नविन बांधकामानी पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारे बांधलेली नाही त्यांच्यावर कारवाई करणे, खड्ड्यांमुळे चाळण झालेले रस्ते त्वरित दुरुस्त करणे, सखल भागात लावण्यात आलेले डीपी महावितरणने त्वरित उंच करावेत आदी महत्वाच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.
15 दिवसांत या समस्या सोडवण्याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यास रहिवाशांच्या जनक्षोभास सामोरे जावे लागेल. पालिका प्रशासनाच्या विरोधात सुद्धा आंदोलन उभारले जाईल. पालिकेच्या वरिष्ठ अधिका-यांना बोलावून सुद्धा ते या ठिकाणी आले नाही त्यामुळे या अधिका-यांचा सुद्धा आम्ही निषेध व्यक्त करतो.
- मनोज घरत, मनसे शहराध्यक्ष, डोंबिवली.