मंदिरं बंद, पण आरोग्यमंदिरं सुरू!; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपाला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 06:05 PM2021-09-07T18:05:35+5:302021-09-07T18:06:35+5:30
आरोग्य मंदिरं हॉस्पिटलच्या रूपाने कार्यरत आहेत.त्यामुळे जनता आशीर्वाद देणार आहे : उद्धव ठाकरे
राज्यातील मंदीरं खुली करावीत याकरिता भाजपाने नुकतेच ठिकठिकाणी शंखानाद आंदोलन करत राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली होती. या मुद्द्यावरुन आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. मंदीरं बंद असली तरी आरोग्य मंदिरं सुरू आहेत आणि ही आरोग्य मंदिरं हॉस्पिटलच्या रूपाने कार्यरत आहेत.त्यामुळे जनता आशीर्वाद देणार आहे असे सांगत ठाकरे यांनी भाजपाचा समाचार घेतला आहे.
डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात कल्याणडोंबिवलीतील कोपर पुलासह विविध विकासकामांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला.यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ठाकरे यांनी हे विधानं केलं आहे. पुढे ते म्हणाले की, धार्मिक मंदिरे बंद असली तरी लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारी आरोग्य मंदिरे मात्र आज सुरू आहेत. त्याबद्दल जनता आपल्याला आशिर्वाद देत असून धार्मिक मंदिरे टप्प्याटप्प्याने उघडण्यात येतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कोव्हिडंचा काळ अजून संपला नसून माझ्या पक्षांसह सर्व पक्षांना मी जबाबदारीने वागण्याचं आवाहन केलं आहे. आपण जबाबदारीने वागलो नाही तर लोकं कसे वागतील? हे सुद्धा त्यांना मी समजावलं असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमात टिप्पणी, राजकीय शेरेबाजी, चिमटे आणि शाब्दिक चकमकींमुळे ही विकासकामांपेक्षा आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊ लागली आहे याची अधिक प्रचिती आली.
दरम्यान मुख्यमंत्र्यांनी यावेळी कल्याण डोंबिवली परिसरात सुरू असणाऱ्या विकास कामांबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे तर केंद्र सरकारचा कोवीड इनोव्हेशन पुरस्कार मिळाल्याबद्दल केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे यावेळी विशेष शब्दांत कौतुक केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र चव्हाण, विश्वनाथ भोईर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नाशिकचे संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, केडीएमसी आयुक्त शहर अभियंता सपना कोळी, सचिव संजय जाधव यांच्यासह शिवसेना आणि भाजपचे अनेक मान्यवर उपस्थित होते.
"...तर घोषणा देऊन काय उपयोग"
एकीकडे जर आपल्या देशातील नागरिक औषधपाणी, ऑक्सिजन आदी आरोग्याच्या सुविधांपासून वंचित असतील तर नुसत्या 'भारत माता की जय' घोषणा देऊन काय उपयोग? ती भारतमाता आपल्याला काय बोलेल अशा शब्दांत ठाकरे यांनी नाव भाजपला टोला लगावला. इतकंच नाही तर घोषणांच्या पलीकडे जाऊन आम्ही हिंदुत्वाची काळजी घेतो असेही ठाकरे यांनी आवर्जून सांगितलं.
आपल्या भाषणात डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी डीपीआर मंजूर होऊनही अद्याप काम सुरू न झालेल्या 428 कोटींच्या रस्त्याचा मुद्दा उपस्थित केला. त्याचाच धागा पकडत मुख्यमंत्री म्हणाले की बॅकलॉगबाबत बोलायचे झाले तर 400 कोटी, साडेचारशे कोटींसह अगोदर साडेसहा हजार कोटींबाबत माहिती घ्यावी लागेल.