घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिरं खुली! ऐतिहासिक दुर्गाडी देवीच्या मंदीरात भाविकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 03:49 PM2021-10-07T15:49:00+5:302021-10-07T15:51:19+5:30
Durgadi Devi temple : कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी मातेच्या मंदिरातही भाविकांची गर्दी झाली आहे.
कल्याण - घटस्थापनेच्या मुहूर्तावर आज मंदिरं खुली झाली असून भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीमध्ये देवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी मातेच्या मंदिरातही भाविकांची गर्दी झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हे ऐतिहासिक मंदिर असून ते कल्याणच्या सुवर्ण ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार आहे.
नवरात्रीच्या काळात याठिकाणी मोठा उत्सव भरतो. मात्र कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी उत्सव रद्द करण्यात आली आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी इतर मंदिरांप्रमाणे हे मंदिरही दर्शनासाठी खुलं झाल्यामुळे भक्तांनीही आनंद व्यक्त केला आहे. कल्याण डोंबिवलीतुनच नाही तर ठाणे जिल्ह्यातून दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी भक्त या ठिकाणी दाखल झाले आहेत.
कोरोनाच्या नियमांचे पालन करून मंदिरात भक्तांना प्रवेश दिला जात आहे. येथील देवीला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. नवरात्र उत्सवाच्या काळात या ठिकाणी भक्तांची अशीच लगबग राहणार आहे. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.