तळोजा एमआयडीसी ते राष्ट्रीय महामार्ग चारपर्यंतच्या रस्त्यांची ९९ कोटी ५१ लाखाची निविदा जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2022 03:07 PM2022-04-29T15:07:23+5:302022-04-29T15:07:32+5:30
काटई शीळ रस्त्याला मिळणार पर्याय
कल्याण- तळोजा औद्योगिक वसाहत येथून थेट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारला जोडणाऱ्या विकास आराखड्यातील प्रस्तावित रस्ताच्या बांधकामाची निविदा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने नुकतीच जाहीर केली आहे.९९ कोटी ५१ लाख रुपयांच्या या कामामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर पोहोचणे सोपे होणार आहे. वाहनचालकांचा काटई शीळ रस्त्याला पर्यायी रस्ता मिळणार आहे. त्यामुळे वाहनचालकांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे. कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीएच्या आयुक्तांची भेट घेत या बाबतचा प्रस्ताव सादर केला होता.
खासदार शिंदे आपल्या मतदार संघाला महत्त्वाच्या मार्गांची जोडण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. एकीकडे शहरातील रस्त्यांची उभारणी करायची आणि त्याच वेळेस शहरांना इतर शहरांशी जोडण्यासाठी रस्त्यांची उभारणी करण्यासाठी निधी मिळवायचा. या दुहेरी धोरणामुळे गेल्या काही वर्षात कल्याण लोकसभा मतदारसंघ इतर शहरांशी आणि महामार्गशी थेटपणे जोडला गेला आहे. ऐरोली शीळ रस्ता, मोठागाव दुर्गाडी टिटवाळा बाह्यवळण रस्ता असे अनेक रस्ते थेट मतदारसंघाला महत्वाच्या रस्त्यांशी जोडणार आहेत.
याचाच एक भाग म्हणून काही महिन्यांपूर्वी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांची भेट घेत वाहतूक आणि दळणवळणीला वेगवान करणाऱ्या प्रकल्पांच्या या कामांचा आढावा घेतला होता. यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाला जोडला गेलेला शेजारचा तळोजा औद्योगिक वसाहतीचा भाग थेट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारला जोडण्याच्या कामाला सुरुवात करण्याची मागणी खासदार डॉ. शिंदे यांनी केली होती.
एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवास यांनी या कामाला हिरवा कंदील दाखवला होता. नुकतीच एमएमआरडीएच्या वतीने तळोजा औद्योगिक वसाहत ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारपर्यंतच्या या रस्त्याची निविदा जाहीर करण्यात आली आहे. एकूण ९९ कोटी ५१ लाख रुपयांच्या खर्चातून या रस्त्याची उभारणी केली जाणार आहे. या रस्त्यामुळे कल्याण डोंबिवली या शहरातून थेट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारला पोहोचणे सहज सोपे होणार आहे. काटई शीळ रस्त्याला आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वाहनचालकांचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. वाहन चालकांना महामार्गाशी जोडण्याचा आणखी एक पर्याय या मार्गामुळे उपलब्ध होणार आहे.