केडीएमसीच्या बारावे घनकचरा प्रकल्पाला भीषण आग! लागली की लावली?
By प्रशांत माने | Published: March 31, 2024 06:11 PM2024-03-31T18:11:52+5:302024-03-31T18:12:03+5:30
१३ तासांनी आग नियंत्रणात आली.
कल्याण: रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास केडीएमसीच्या येथील बारावे घनकचरा प्रक्रिया प्रकल्प केंद्राला भीषण आग लागली. ही आग इतकी प्रचंड होती की इथला संपूर्ण सूका कचरा जळून खाक झाला आहे. संध्याकाळी सहा वाजता तब्बल १३ तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाला यश आले. दरम्यान आग चोहोबाजुंनी लागल्याने ती लागली की लावली? याबाबत शंका उपस्थित होत आहे.
बारावे प्रकल्पामध्ये दैनंदिन १०० मॅट्रीक टन प्रतिदिन सुका कचरा येतो. त्याचे वर्गीकरण करून तो अन्य उत्पादक कंपन्यांकडे पाठविला जातो. यामध्ये बहुतांश आरडीएफ मटेरियल हे सिमेंट उत्पादकांच्या मागणीनुसार पाठविले जाते. या प्रकल्पाच्या ठिकाणी १५०० मॅट्रीक टन कचरा साठला होता. रविवारी पहाटेच्या सुमारास या कच-याला अचानक आग लागली. रात्रपाळीत याठिकाणी काम करणा-या कामगारांनी लगतच्या असलेल्या बारावे मलनि:सारण प्रकल्पातून उपलब्ध पाण्याने आग विझविण्याचे काम सुरू केले. परंतू कच-याला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण करताच याची माहिती अग्निशमन विभागाला दिली गेली. घटनास्थळी तातडीने अग्निशमन बंब रवाना झाले.
आगीची तीव्रता पाहता सात बंब आणि पाण्याचे १३ टँकर त्याठिकाणी दाखल झाले. आगीचे वृत्त कळताच केडीएमसीच्या आयुक्त डॉ इंदु राणी जाखड यांनीही घटनास्थळी भेट देऊन आग नियंत्रणात आणण्याबाबत आवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी मनपाच्या शहरअभियंता अनिता परदेशी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील हे उपस्थित होते. मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांनी या आगीवर १३ तासात नियंत्रण मिळविले. आगीत प्रीसॉट युनिट, श्रेडर युनिट व शेडच्या छताचे पुर्णपणे नुकसान झाले आहे. प्रकल्पाला भीषण आग लागल्याच्या घटना २०२२ आणि २०२३ मध्येही घडल्या होत्या. आता पुन्हा एकदा लागलेल्या आगीत प्रकल्पाचे कोटयावधी रूपयांचे नुकसान झाले आहे.