किल्ले दुर्गाडीवर नवरात्रोत्सव साजरा करण्यास ठाकरे गटाला नाकारली परवानगी
By मुरलीधर भवार | Published: October 13, 2023 08:36 PM2023-10-13T20:36:03+5:302023-10-13T20:39:13+5:30
किल्ले दुर्गाडी ऐतिहासिक आणि पुरातन वास्तू असल्याने ताबा जिल्हाधिकाऱ्यांकडे
मुरलीधर भवार-कल्याण: कल्याणच्या ऐतिहासिक किल्ले दुर्गाडीवर नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाप्रमाणेच ठाकरे गटाने जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाकडे रितसर परवानगी मागितली होती. मात्र अप्पर जिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी संयुक्तीक कारण न देता ठाकरे गटाला उत्सव साजरा करण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे किल्ले दुर्गाडीवर शिवसेना शिंदे गटाकडून नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
किल्ले दुर्गाडीवर नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी ठाकरे गटाचे कल्याण शहर प्रमुख सचिन बासरे यांनी पोलिस प्रशासनासह टाणे जिल्हाअधिकारी यांच्याकडे परवानगी मागितली होती. ही परवानगी नाकारता अप्पर जिल्हाधिकारी परदेशी यांनी म्हटले आहे की, त्याठिकाणी विजेची रोषणाई करणे, मंडप उभारणे, रंगरंगोटी करणे याची परवानगी ठाकरे गटाने मागितली होती. मात्र ही कामे आधीच केली गेली असल्याने त्याठिकाणी ही कामे करता येणार नाही. त्यामुळे ही कामे करण्याची परवानगी नाकारली आहे. ठाकरे गटाने म्हटले आहे, अप्पर जिल्हाधिकारी परदेशी यांनी परवानगी नाकारता संयुक्तिक कारण दिलेले नाही.
किल्ले दुर्गाडी ऐतिहासिक आणि पुरातन वास्तू आहे. तिचा ताबा जिल्हाधिकारी यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्याकडून परवानगी दिली जाते. परवानगीकरता ठाकरे गटाचे शहर प्रमुख बासरे यांनी २५ सप्टेंबर रोजी पोलिस प्रशासनासह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज केला होता. त्यांना परवानगी देण्यासाठी जो पोलिस प्रशासनाचा अहवाल तयार केला. त्याचा संदर्भ देताना १३ आ’क्टोबरचा संदर्भ दिला आहे. २५ सप्टेंबरपासून पोलिस प्रशासन काय करीत होते असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. त्याचबरोबर
मागच्या वर्षीही ठाकरे गटाकडून किल्ले दुर्गाडीवर नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी मागितली गेली होती. तेव्हा आमदार विश्वनाथ भोईर हे शहर प्रमुख पदी होते. परंपरेनुसार किल्ले दुर्गाडीवर उत्सव करण्याची परवानगी शहर प्रमुखास दिली जाते. मात्र या वेळेस शहर प्रमुख रवी पाटील आहे. त्यामुळे मागच्या वर्षीचे कारण आणि यंदाचे वर्षीचे परवानगी नाकारण्याचे कारण कोणत्याही प्रकारे सुसंगत असल्याचे दिसून येत आहे.