ठाकरे-शिंदे समर्थकांमध्ये डोंबिवली शहर शाखेत बाचाबाची, धक्काबुक्की?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2022 02:57 PM2022-06-28T14:57:36+5:302022-06-28T14:58:21+5:30
मध्यवर्ती शिवसेना शाखा ही शिवसैनिकांची असून, शिंदे समर्थकांनी त्यावर हक्क सांगायचा नाही, अशी भूमिका शिवसेना शहर महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली.
डोंबिवली: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनी सोमवारी एकनाथ शिंदे समर्थकांना मध्यवर्ती शहर शाखेत प्रवेश करण्यापासून रोखण्याची भूमिका घेतली. तसेच एकनाथ शिंदे आणि खा. श्रीकांत शिंदे यांचे चार फोटो काढले. यामुळे ठाकरे व शिंदे समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक व धक्काबुक्की झाली. यामुळे डोंबिवलीमधील वातावरण तंग झाले होते.
मध्यवर्ती शिवसेना शाखा ही शिवसैनिकांची असून, शिंदे समर्थकांनी त्यावर हक्क सांगायचा नाही, अशी भूमिका शिवसेना शहर महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. जे शिवसेनेचे प्राथमिक सदस्यही नाहीत, त्यांनी इथे येऊन हक्क सांगण्याची भाषा करू नये. आधी इथून निघून जावे, असा पवित्रा महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्याने शहर शाखेतील वातावरण तापले व तणाव वाढला. सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास डोंबिवली शहर शाखेत शिंदे समर्थक राजेश कदम, योगेश जुईकर आणि अन्य दोघे जण गेले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेले उपशहर प्रमुख विवेक खामकर यांनी त्यांना कार्यालयात बसण्यास विरोध केला व बाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे गोंधळ झाला, बाचाबाची, धक्काबुक्की झाली. बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनीही या घटनेस दुजोरा दिला.
कल्याण - डोंबिवली महानगर संघटक वैशाली दरेकर, विधानसभा संघटक कविता गावंडे, शहर संघटक मंगला सुळे, किरण मोंडकर, शिल्पा मोरे, सीमा आयर, ममता घाडीगावकर, प्रकाश तेलगोटे, श्याम चौगुले, अभय घाडीगावकर आदींनी शिंदे समर्थकांना मध्यवर्ती शाखेत प्रवेश करण्यापासून रोखले. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून शिंदे समर्थकांना बाहेर काढले. तेव्हा उपस्थित स्त्री - पुरुष शिवसैनिकांनी ‘उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणा देत एकनाथ शिंदे व श्रीकांत शिंदे यांचे फाेटाे उतरवले.
सीसी कॅमेरे फुटेज बंद करण्यात आले?
ठाकरे व शिंदे समर्थकांत बाचाबाची, धक्काबुक्की सुरु होताच शहर शाखेतील सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने बंद करण्यात आले. या कॅमेऱ्याचे फुटेज माध्यमांच्या हाती लागू नये, याची खबरदारी घेताना असे काही घडलेच नाही, असे दोन्ही बाजूकडून भासवले जाऊ लागले. खा. शिंदे यांचे काम करणाऱ्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांना त्यांचे काम करू द्यावे. त्यांना काहीही होणार नाही, अशी भूमिका ठाकरे समर्थकांनी घेतली.