डॉजबॉल राज्य स्पर्धेत ठाणे वरिष्ठ गट पुरुष गटाने पटकावला द्वितीय क्रमांक
By सचिन सागरे | Published: May 6, 2024 05:28 PM2024-05-06T17:28:53+5:302024-05-06T17:30:00+5:30
या स्पर्धेत ठाणे वरिष्ठ पुरुष गटाने द्वितीय क्रमांक पटकावला.
सचिन सागरे, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण : महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनच्या मान्यतेने बीड जिल्हा डॉजबॉल असोसिएशनच्या माध्यमातून १२ वी वरिष्ठ गट पुरुष व महिला महाराष्ट्र राज्य डॉजबॉल अजिंक्यपद स्पर्धा बीड येथे ३ ते ५ मे दरम्यान संपन्न झाली. या राज्य स्पर्धेत महाराष्ट्रातील सुमारे २५ जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेत ठाणे वरिष्ठ पुरुष गटाने द्वितीय क्रमांक पटकावला.
ठाणे जिल्ह्यातील पुरुष गटातील खेळाडूंनी उपउपांत्य सामन्यात सोलापूर संघाचा ८ गुणांनी पराभव केला. उपांत्य सामन्यात ठाणे पुरुष गटाने पुणे संघाचा ५ गुणांनी पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामना बीड जिल्ह्यासोबत झाला. अत्यंत अटीतटीच्या लढतीत बीड जिल्हा पुरुष गटाने ठाणे जिल्ह्याचा एक गुणाने पराभव केला. ठाणे जिल्ह्यातील पुरुष गटातील खेळाडूंनी अत्यंत दर्जेदार खेळाचे प्रदर्शन केले. त्यामुळे पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी पुरुष गटात जीत सिंग, साहिल परदेशी व महिला गटात माहि पावसकर या खेळाडूंची निवड झाली.
स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळ्यात महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे सचिव डॉ. हनुमंत लुंगे, बीड जिल्हा डॉजबॉल असोसिएशन अध्यक्ष वकील बाबुराव अनारसे, सचिव डॉ. सुनील पंढरे, राज्य पंच हरीश काळे, व श्याम धस आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्य स्पर्धेत ठाणे जिल्हा पुरुष संघाने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल ठाणे जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे अध्यक्ष अंकुर आहेर, कार्यवाह सदाशिव पाचपोर, सर्व पदाधिकारी आणि गुरुनानक इंग्लिश स्कूलच्या ज्येष्ठ क्रीडा शिक्षिका लता पाचपोर महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संसदेचे अध्यक्ष डॉ. अशोक बहिरव, विजय थोरात, सुनिल पगारे, भगवान नरवाडे, सारंगधर बागडे आदींनी खेळाडूंचे कौतुक केले.