ठाणे ते कर्जत-कसारा शटल हाच गर्दीवर उपाय; मध्य रेल्वेकडून २०१२ पासून टाळाटाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 09:55 AM2024-06-28T09:55:28+5:302024-06-28T09:55:48+5:30
ठाणे जिल्ह्याकडे रेल्वे प्रशासन नेहमीच कानाडोळा करत असून, प्रवाशांना सापत्न वागणूक देत आहे.
अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली : तब्बल १९ वर्षांपूर्वी २६ जुलै रोजी ढगफुटी होऊन ठाणे ते कर्जत - कसारादरम्यान मध्य रेल्वे कोलमडली होती, तेव्हा प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे ते कर्जत - कसारादरम्यान शटल सर्व्हिस सुरू केली होती. ठाणे व त्यापुढील भागात वास्तव्य करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असल्याने रेल्वेतून पडून जाणारे बळी याच भागात आहेत. हे बळी रोखण्यासाठी लोकलबरोबर शटल सर्व्हिस सुरू करण्याची मागणी मध्य रेल्वेचे बहिरे प्रशासन मान्य करीत नसल्याने बळी थांबलेले नाहीत. मुंबई उच्च न्यायालयाने कानउघाडणी केल्यावर तरी ही सेवा सुरू होईल, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.
ठाणे जिल्ह्याकडे रेल्वे प्रशासन नेहमीच कानाडोळा करत असून, प्रवाशांना सापत्न वागणूक देत आहे. २०१४पासून नवी मुंबई भागात वाढत जाणारी गर्दी पाहता ठाणे येथून ट्रान्स हार्बरमार्गे प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना ठाणे स्थानकातून कर्जत, कसारा मार्गावर लोकलची शटल सेवा हवी आहे. कल्याण - ठाणे मार्गावर रेल्वे गर्दीचे सर्वाधिक बळी जातात. संध्याकाळी ठाणे स्थानकात पाय ठेवायला जागा नसते.
रेल्वेने २००५ मध्ये २१ दिवस ठाणे ते कर्जत - कसारा मार्गावर शटल सेवा दिली होती. त्याचा लाभ लाखो प्रवाशांनी घेतला होता.
या मार्गावर भविष्यात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने शटल सेवा सुरू करावी, अशी मागणी अभ्यासकांनी केली होती. त्याकडे रेल्वेने गांभीर्याने लक्ष दिले नाही, आता ठाणे व त्यापुढील रेल्वेस्थानकात प्रवाशांची संख्या मोठी आहे. गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने कोणत्याही प्रभावी उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस डोंबिवली, कोपर, दिवा, मुंब्रा, कळवा मार्गावर लोकलमधून पडून गर्दीमुळे बळी जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. गेल्या दोन महिन्यांत पाच डोंबिवलीकर लोकलच्या गर्दीचे बळी ठरले. त्यात युवक, युवतींचा सर्वाधिक समावेश असून, घरातील कर्ता माणूस गमावल्याने कुटुंबांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे.
सहा महिन्यांत दोनशेहून जास्त प्रवासी जखमी
- ठाणे ते कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहा महिन्यांत दोनशेहून जास्त प्रवासी रेल्वे अपघातामध्ये जखमी झाले आहेत.
- सुमारे पावणेदोनशेहून जास्त प्रवाशांचा विविध कारणाने अपघाती मृत्यू झाला आहे.
- ठाणे हद्दीत १३९ मृत्यू आणि १०१ जण जखमी झाल्याची नोंद पोलिसांकडे आहे.
ठाणे स्थानक यामुळे आहे महत्त्वाचे
- ठाणे स्थानकात लांब पल्ल्याच्या २००हून जास्त गाड्या अप व डाउन मार्गावर थांबतात. त्यामधून लाखो लोक प्रवास करतात. बहुतांश प्रवासी ठाणे जिल्ह्यातले असल्याने त्यांना लोकलने जावे लागते. अवजड सामान घेऊन आबालवृद्ध प्रवास करतात.
- ठाणे स्थानकातून उपनगरी लोकलच्या १,१५० हून जास्त फेऱ्या होतात. त्यामधून सुमारे चार लाख प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे ठाणे स्थानकातून शटल सर्व्हिस सुरू होणे अत्यावश्यक आहे.
- कसारा, कर्जत मार्गावर लोकल सोडल्यास शेवटच्या प्रवाशाला दिलासा मिळेल. खोपोली मार्गावर कर्जतहून जास्त लोकल सोडाव्यात, अशी मागणी आहे.
शटल सेवेची प्रवासी महासंघाची मागणी २०१२ पासून प्रलंबित आहे. ठाणे ते कर्जत, कसारा प्रवाशांना दिलासा देण्याकरिता हाच रामबाण उपाय आहे. २००५मध्ये लांब पल्ल्याच्या गाड्या चालवल्या होत्या. त्या शक्य नसेल; पण लोकल तर चालवा. - नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, ठाणे रेल्वे प्रवासी संस्था
...या वेळांना हव्या लोकल
- सकाळी ७:०० पासून १०:३० वाजेपर्यंत कर्जत, कसारा येथून दर अर्ध्या तासाने ठाणे लोकल सोडणे.
- संध्याकाळी ४:३० पासून रात्री ११:०० पर्यंत दर अर्ध्या तासाने बदलापूर, आसनगाव, टिटवाळा या कसारा, कर्जत मार्गावर लोकल सोडणे.
- ठाणे येथून बदलापूर ५० मिनिटे, आसनगाव तेवढाच वेळ लागतो. कर्जत गाठायला सुमारे सव्वा तास लागेल. कसाऱ्याला दीड तास लागतो. पण, शटल सर्व्हिसचा लाखो प्रवाशांना फायदा होईल.