‘पक्षनिष्ठे’चा देखावा पोलिसांनी केला जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 04:22 AM2022-09-02T04:22:09+5:302022-09-02T04:23:05+5:30
विजय तरुण मंडळाने यंदा गणेशोत्सवानिमित्त ‘पक्षनिष्ठा’ या विषयावर तयार केलेला देखावा गणेश चतुर्दशीच्या दिवशी पहाटे तीन वाजता पोलिसांनी जप्त केला व मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल केला
कल्याण : विजय तरुण मंडळाने यंदा गणेशोत्सवानिमित्त ‘पक्षनिष्ठा’ या विषयावर तयार केलेला देखावा गणेश चतुर्दशीच्या दिवशी पहाटे तीन वाजता पोलिसांनी जप्त केला व मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. मंडळाने या कारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. राज्य सरकारच्या दबावाला बळी पडून पोलिसांनी ही कारवाई केल्याने शिवसेनेने राज्य सरकारचा निषेध केला.
‘पक्षनिष्ठा’ या विषयावर देखावा साकारला होता. मंडळास पोलिसांनी नोटीस बजावली होती. मात्र मंडळ देखाव्याच्या विषयावर ठाम असल्याने पोलिसांनी गणेश चतुर्दशीच्या दिवशी पहाटे जाऊन साकारलेला देखावा जप्त केला. पोलिसांची ही कारवाई हिटलरशाही असून घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी असल्याचा आरोप शिवसेनेचे महानगरप्रमुख आणि मंडळाचे विश्वस्त विजय साळवी यांनी केला. कारवाईच्या निषेधार्थ मंडळाने गणेशाची स्थापना केली नाही. यापुढेही गणपती उत्सव साजरा करणार नाही, असा पवित्रा घेतला. पोलिसांच्या कारवाईविरोधात गुरुवारी मंडपात शिवसेनेच्या वतीने महाआरती करण्यात आली.
शिवसेनेच्या वतीने निषेधाचे फलक शहरात लावण्यात आल्याने पोलिसांनी शहरप्रमुख सचिन बासरे आणि महानगरप्रमुख साळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, शिवसेनेचे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांच्यासह शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन बासरे, ज्येष्ठ नेते बाळ हरदास, शरद पाटील यांनी पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची भेट घेतली.