कल्याण दुर्गाडी परिसरातील आरमार स्मारकाची सेवानिवृत् व्हाॅईस अॅडमिरल एस. व्ही. भोकरे यांनी केली पाहणी
By मुरलीधर भवार | Published: November 10, 2022 04:42 PM2022-11-10T16:42:33+5:302022-11-10T16:42:43+5:30
कल्याण डाेंबिवली महापालिका स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याणच्या दुर्गाडी खाडी किनारी मराठा आरमाराचे स्मारक उभारत आहे.
कल्याण-कल्याण डाेंबिवली महापालिका स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याणच्या दुर्गाडी खाडी किनारी मराठा आरमाराचे स्मारक उभारत आहे. या स्मारकाची पाहणी नाैसेनेचे सेवानिवृत्त अॅडमिरल एस. व्ही. भाेकरे यांनी आज पाहणी केली. यावेळी महापालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे उपस्थित हाेते. 4 डिसेंबर राेजी नाैसेना दिनी या स्मारकाचे लाेकार्पण करण्यात येणार आहे.
स्मारक स्वरुपात युध्द नौका टी-८० विराजमान करण्याबाबत नौदल आणि कल्याण डाेंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्प यांच्यात नुकताच एक सामंजस्य करार करण्यात आला. आज करण्यात आलेल्या पाहणी प्रसंगी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे, कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा, महापालिका सचिव संजय जाधव उपस्थीत हाेते.उपायुक्त
छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गाडी किल्ल्यानजीक मराठा आरमाराची सुरुवात केली.त्याच खाडी किनाऱ्यचा विकास केला जात आहे. त्याच एक भाग म्हणून इथे नौदल संग्रहालय उभारले जात आहे. त्याचा आराखडा भारतीय नौसेनेच्या सबमरीननुसार तयार केला आहे.
सुमारे १११ मी. लांब असलेल्या या सबमरीनच्या संग्रहालयात १७ ते १८ व्या शतकापर्यंत मराठा योध्यांच्या आरमारांचा इतिहास आणि ब्रिटीशांच्या रॉयल नेव्हींपासून स्वतंत्र भारताच्या नौसेनेचा आजपर्यंत इतिहास प्रसिध्द केला जाईल. हा इतिहास पेंटींग, शिल्प, मॉडेल व मल्टीमिडियाच्या स्वरुपात आहे. भारताच्या अरिहंत या पहिल्या पाणबुडीवरुन प्रेरीत होऊन या सबमरीनसचा आराखडा बनवण्यात आला आहे,अशी माहिती एसकेडीसीएल चे हेरिटेज व्यवस्थापन सल्लागार सचिन सावंत यांनी दिली. या प्रकल्पाची संकल्पना महापालिकेचे माजी आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी मांडली होती.
महानगरपालिकेने आरमार रुपी स्मारक उभारण्यासाठी खुप चांगलं ठिकाण निवडलं आहे ,या माध्यमातून पर्यटकांना व विदयार्थ्यांना नौदलाच्या तसेच शिवकालीन इतिहासाबाबत माहिती उपलब्ध होईल आणि महापालिका युध्द नौकेच्या स्वरुपात उभारत असलेल्या स्मारकाच्या रुपाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीतील इतिहास पुन्हा जिवंत स्वरुपात सर्वांसमोर उभा राहील असे भोकरे यांनी सांगितले.
४ डिसेंबर १९७१ मध्ये भारतीय नौसेनेने पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला करून संपूर्ण बंदर उध्वस्त केले होते आणि पूर्व पाकिस्तानातून पश्चिम पाकिस्तानात जाणारी जलवाहतूक पूर्णपणे बंद केली होती. ज्याचा परिणाम म्हणून जमिनीवर पश्चिम पाकिस्तानला कोणतीही मदत मिळू शकली नाही. ज्यामुळे भारतीय लष्कराने १९७१ चे युद्ध एकहाती जिंकल्याचा आपल्याला संदर्भ मिळतो. त्या दिवसाचे स्मरण म्हणून भारतीय नौसेना ४ डिसेंबर रोजी नौसेना दिनी लोकार्पण प्रस्तावित करण्यात आले आहे.