रामलल्लाच्या बालमूर्तीमध्ये बदलापूरच्या चित्रकाराचा कलाविष्कार; सुचवलेल्या सूचनांचा आदर

By पंकज पाटील | Published: January 9, 2024 01:37 PM2024-01-09T13:37:06+5:302024-01-09T13:37:46+5:30

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा होणाऱ्या मूर्तीचे बदलापूर कनेक्शन

The artistry of Badlapur painter in Ramlalla's child idol Respect the suggested instructions | रामलल्लाच्या बालमूर्तीमध्ये बदलापूरच्या चित्रकाराचा कलाविष्कार; सुचवलेल्या सूचनांचा आदर

रामलल्लाच्या बालमूर्तीमध्ये बदलापूरच्या चित्रकाराचा कलाविष्कार; सुचवलेल्या सूचनांचा आदर

पंकज पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, बदलापूर: बदलापुरात राहणारे ज्येष्ठ चित्रकार सचिन जुवाटकर यांनी अयोध्येतील रामलल्लाच्या मुख्य मूर्तीसाठी चित्र साकारले. या चित्राचा काही भाग मूर्ती साकारताना स्वीकारण्यात आला आहे. देशभरातील दिग्गज चित्रकारांकडून रामलल्लाच्या मूर्तीसाठी चित्र मागवण्यात आले होते. त्यात जुवाटकर यांच्याही चित्राचा समावेश होता.

अयोध्येत साकारण्यात आलेल्या राम मंदिरातील मुख्य गाभाऱ्यातील रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या मुख्य मूर्तीचे कोरीव काम करण्यासाठी देशभरातील दिग्गज चित्रकारांना रामलल्लाचे चित्र रेखाटण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार देशभरातील अनेक चित्रकारांनी मूर्ती तयार करण्यासाठी आपल्या कल्पकतेने चित्र साकारले. मात्र समितीने या चित्रांचे परीक्षण केल्यानंतर देशभरातील चार चित्रकारांचे चित्र स्वीकारले. त्यात मुंबईचे वासुदेव कामत आणि बदलापूरचे सचिन जुवाटकर यांच्या चित्राचा समावेश होता.

समितीशी संलग्न असलेले चित्रकार विश्वकर्मा यांच्या चित्राचा महत्त्वाचा भाग मूर्ती तयार करताना स्वीकारण्यात आला. देशभरातील चार दिग्गज कलाकारांनी साकारलेल्या चित्राच्या आधारावरच अयोध्येतील रामलल्लाची मूर्ती साकारण्यात आली आहे. ज्यांच्या देखरेखीखाली राम मंदिराची उभारणी केली जात आहे ते डॉ. सच्चिदानंद जोशी यांच्यामुळेच आपल्याला रामलल्लाची सेवा करण्याची संधी मिळाल्याची प्रतिक्रिया जुवाटकर यांनी दिली.

सुचवलेल्या सूचनांचा आदर

जुवाटकर यांनी रामलल्लाचे रेखाटलेले चित्र आपल्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून समितीकडे सादर केल्यानंतर त्यांच्या सूचनांचा आदर समितीने केला. जी मूळ मूर्ती साकारण्यात येत आहे त्यात जुवाटकर यांनी आपल्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून केलेल्या काही सूचनांचा सहभाग करून घेण्यात आला आहे.

निमंत्रण पत्रिकेवरही छायाचित्र

अयोध्येत साकारण्यात आलेल्या रामलल्लाच्या मूर्तीसाठी जे चित्र निश्चित करण्यात आले आहे त्या चित्राचा वापर मुख्य निमंत्रण पत्रिकेवर करण्यात आला आहे.

पाच वर्षे वयोगटातील मूर्ती

राममंदिरात जी मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे ती मूर्ती पाच ते सहा वर्षे वयोगटातील रामाची मूर्ती असून त्या वयोमानानुसारच चित्र साकारण्यात आले होते.

‘रामलल्लाची मूर्ती साकारण्यासाठी जे चित्र अपेक्षित होते ते चित्र पाठवण्यासाठी मला कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कल्पना दिली. त्यांच्यामुळेच आज आपल्या चित्राचा काही भाग रामलल्लाच्या मूर्तीत वापरल्याचा आपल्याला कायमस्वरूपी आनंद आहे.’
- सचिन जुवाटकर, चित्रकार, बदलापूर

Web Title: The artistry of Badlapur painter in Ramlalla's child idol Respect the suggested instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.