रस्त्यावरील डांबर उखडून गेले वाहून; नालंबी मार्गाची दोन वर्षांत दुरुस्ती नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 06:36 AM2023-09-28T06:36:35+5:302023-09-28T06:37:05+5:30
टँकर, सिमेंट रेडिमिक्स वाहनामुळे मोठ्या अपघाताची भीती
पंकज पाटील
अंबरनाथ : तालुक्याला कल्याण ग्रामीण भागाशी जोडणारा नालंबी रोड सध्या वाहतुकीसाठी धोकादायक ठरला आहे. गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याची योग्य दुरुस्ती न झाल्यामुळे, या रस्त्यावरील सर्व डांबर वाहून गेल्याने अपघात घडण्याची शक्यता आहे. या रस्त्यावरून उल्हास नदीतून बेकायदा पाणी भरून जाणारे टँकर तसेच सिमेंट प्लांटमधून रेडिमिक्स काँक्रिटची वाहतूक, अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते.
ग्रामीण भागातील नालंबी भिसोळ आणि आपटी ही सर्व गावे अंबरनाथ शहराशी या रस्त्याने जोडली गेली आहेत. दैनंदिन व्यवहारासाठी ग्रामस्थ अंबरनाथ शहरात येत असतात. आधी हा रस्ता सुस्थितीत होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेला हा रस्ता गेल्या दोन ते तीन वर्षांपासून धोकादायक अवस्थेत आहे. २०२१ मध्ये या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र दुरुस्ती केल्यानंतर वर्षभरदेखील हा रस्ता टिकला नाही. पहिल्याच पावसात हा रस्ता अनेक ठिकाणी खचला. संबंधित ठेकेदाराने पावसाळा झाल्यानंतर या ठिकाणी पॅचवर्क करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. काम निकृष्ट झाल्यामुळे अवघ्या सहा महिन्यातच खड्डे पडले.
यंदाच्या पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे खचला. अंबरनाथच्या कोहजगावपासून नालंबीकडे जाणाऱ्या या डोंगराळ रस्त्यावर अनेक ठिकाणी अवघड वळणे असल्यामुळे त्या ठिकाणी योग्य डांबरीकरण करणे गरजेचे होते. मात्र डांबरीकरण न केल्याने अवघड वळणावर मोठी वाहने उलटण्याचा धोका निर्माण झाला.
अंबरनाथहून टिटवाळ्याकडे जाण्यासाठी हा रस्ता महत्त्वपूर्ण आहे. यासोबतच हा रस्ता मुरबाडमार्गे नगरकडे जात असल्यामुळे अनेक वाहने या मार्गावरून जात असतात.
उल्हास नदीमधून अनेक टँकर माफिया पाणी चोरून याच रस्त्यावरून अंबरनाथ शहरात पुरवठा करीत आहेत. त्यामुळे बेकायदा चालणाऱ्या टँकरमुळे हा रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे.
कल्याण ग्रामीण
भागामध्ये अनेक ठिकाणी रेडिमिक्सचे प्लांट उभारण्यात आल्याने त्या प्लांटमधून अंबरनाथकडे मोठ्या प्रमाणात रेडिमिक्स काँक्रिटच्या गाड्यांचा ताफा जात असल्याने हा रस्ता खचण्याचे प्रमाण वाढले.