भुयारी गटार चेंबरच्या दुरुस्तीवरुन भाजप आमदारांनी अभियंत्याला घेतले फैलावर
By मुरलीधर भवार | Published: September 12, 2023 05:15 PM2023-09-12T17:15:56+5:302023-09-12T17:16:42+5:30
कल्याण पूर्वेतील भुयारी गटाचे चेंबर नादुरुस्त झाले होते. त्याच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा केल्यावर ते दुरुस्त करण्यात आले. त्याची पोस्ट सोशल मिडिया अकाऊंटवर टाकण्यात आली होती.
कल्याण-कल्याण पूर्वेतील भुयारी गटाराच्या चेंबरच्या दुरुस्तीच्या मुद्यावरुन भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी आज महापालिकेच्या उपअभियंत्याला चांगले फैलावर घेतले. तुमच्या कामाबद्दल तुम्हाला पुरस्कारच दिला पाहिजे अशा शब्दात त्यांनी अभियंत्याला चांगलेच सुनावले.
कल्याण पूर्वेतील भुयारी गटाचे चेंबर नादुरुस्त झाले होते. त्याच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा केल्यावर ते दुरुस्त करण्यात आले. त्याची पोस्ट सोशल मिडिया अकाऊंटवर टाकण्यात आली होती. त्यांची पोस्ट पाहताच शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी हे काम आमदारांच्या प्रयत्नांनी झाले नसून शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे झाले असल्याचे सांगितले. त्यानंतर आज महापालिकेचे उपअभियंते उमेश भट यांना आमदारांनी त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले होते. त्यांनी झालेल्या कामाचा पाठपुरावा कोणी केला. कधी केला. त्याचे पत्र कोणी दिले होते. याचा खुलासा करावा. आ’नलाईन तक्रारीवर इतक्या तातडीने दखल घेतली जाते. दुपारी दोन वाजताची तक्रार लगेच पाच वाजता दूर केली जाते. त्याचे फोटो पाठविले जातात. खरोखर महापालिका इतकी फास्ट झाली असेल तर तुमचा सत्कार केला पाहिजे. आत्ताच्या आत्ता शहरातील नागरी समस्यांच्या १३ तक्रारी आ’नलाईनद्वारे करतो. त्याचीही अशाच प्रकारे दखल घेऊन तातडीने त्या दूर करावी असे सांगितले. या सगळ्या प्रश्नांच्या सरबत्तीवर अभियंत्याकडे काही एक उत्तर नव्हते. त्यांनी त्याठिकाणी मौन बाळगणे पसंत केले.
परस्परांच्या विरोधात टिका
दरम्यान शिवसेना शहर प्रमुख गायकवाड यांनी भाजप आमदार गेल्या १५ वर्षापासून पोपटपंची करती आहे. त्यांच्याकडून थापा मारल्या जाता. ते कर्तव्य शून्य आमदार असल्याची टिका केली आहे. शहर प्रमुख गायकवाड यांच्या टिकेला भाजप राज्य परिषदेचे पदाधिकारी संदीप तांबे यांनी शहर प्मुख गायकवाड हे स्टंटबाजी करीत आहेत. आमदारांच्या विरोधात बोलून ते मोठे होण्याचा प्रयत्न करीत आहेत अशी टिका केली आहे.