स्मशानभूमी घराशेजारी आली; आरोग्यावर दुष्परिणाम होतो का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2023 12:20 PM2023-05-23T12:20:04+5:302023-05-23T12:20:17+5:30
वायुप्रदूषण आरोग्याला ठरते घातक; धुरामुळे नागरिक त्रस्त
- प्रशांत माने
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : स्मशानभूमी नागरी वस्तीपासून दूर असावी, असा सर्वसाधारण संकेत आहे; पण वाढत्या शहरीकरणात वेशीबाहेर असलेल्या बहुतांश स्मशानभूमीच्या सभोवताली आता वस्ती वाढून त्या घराशेजारी आल्याचे पाहायला मिळते.
डोंबिवली शहरात अनेक स्मशानभूमी बांधून वापराविना खितपत पडल्या आहेत; परंतु सद्य:स्थितीला शिवमंदिर रोडवरील मोक्षधाम आणि पाथर्ली स्मशानभूमी अशा दोनच सुरू आहेत. वायू प्रदूषण हे नेहमीच आरोग्यासाठी घातक असते.
या दोन्ही स्मशानभूमीत गॅस शवदाहिनीची सुविधा आहे; परंतु काहींचा लाकडावरच अंत्यसंस्कार करण्याचा आग्रह असतो. त्यामुळे त्यातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे प्रदूषणात भर पडते. ज्यांना अस्थमा, ॲलर्जीसारखे आजार आहेत त्यांच्या आरोग्यावर या प्रदूषणाचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरी वस्त्यांच्या विळख्यात स्मशानभूमी
शास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी गावखेड्यात स्मशानभूमी या वेशीबाहेरच ठेवली जायची. मात्र, वाढत्या शहरीकरणात जिथे जागा तिथे वस्ती हे चित्र असल्याने इथल्या स्मशानभूमीदेखील नागरी वस्त्यांच्या विळख्यात सापडल्याचे पाहायला मिळतात.
रामनगर शिवमंदिर रोडवरील मोक्षधाम ही स्मशानभूमी डोंबिवली रेल्वेस्थानकापासून १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. या स्मशानभूमीभोवती सुरुवातीच्या काळात फारशी वस्ती नव्हती; परंतु आता तिथे मोठ्या प्रमाणात बांधकामे होऊन
वस्ती वाढली आहे. दुसरीकडे
पाथर्ली स्मशानभूमीच्या भोवताली, तसेच समोरच्या बाजूस मोठी वसाहत आहे. त्याठिकाणी टॉवरदेखील उभे राहिले आहेत.
धुराचा त्रास ‘जैसे थे’
डोंबिवली येथील एकमेव सुसज्ज आणि मोठी स्मशानभूमी म्हणून रामनगरमधील शिवमंदिर मोक्षधामची
ओळख आहे.
दिवसभरात येथे १५ ते १६ मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणले जातात. याठिकाणी गॅस शवदाहिनी आहे; परंतु काही जण लाकडावर दहन करून अंत्यसंस्कार विधी करतात. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर धूर आजूबाजूला पसरतो.
यावर उपाय म्हणून केडीएमसीने हा धूर नियंत्रित करण्यासाठी स्मोक
न्यूसेंस ॲबेटमेंट सिस्टम बसविली आहे.
त्यामुळे याठिकाणी धुराचा त्रास कमी झाला आहे; पण पाथर्ली स्मशानभूमीत ही सिस्टम नसल्याने त्याठिकाणी दहन करतेवेळी मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडून वस्त्यांच्या ठिकाणी पसरतो.
आरोग्यावर परिणाम होतो का?
वायू प्रदूषणाचा त्रास हा अस्थमा आणि ॲलर्जी असलेल्यांना होतो. त्यामुळे ज्याठिकाणी स्मशानभूमीतून दहन करतेवेळी मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडत असेल तर आजूबाजूच्या वस्तीमधील २ ते ५ टक्के नागरिकांना वायू प्रदूषणाचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्याठिकाणी विद्युत, तसेच गॅस शवदाहिनी असेल त्याठिकाणी धुराचा त्रास होत नाही. - डॉ. समीर जोशी, डोंबिवली
स्मशानभूमी निर्जन स्थळी हलवावी
वाऱ्याची दिशा जशी तसा धूर आजूबाजूला पसरतो. त्याचा सर्वाधिक फटका टॉवरमध्ये राहणाऱ्यांना बसतो. पाथर्ली स्मशानभूमीच्या भोवताली वसाहती, तसेच टॉवर उभे राहिले आहेत. स्मशानभूमीत ज्यावेळी मृतदेह लाकडांवर दहन केला जातो. त्यावेळी धुराबरोबर बराच वेळ परिसरात उग्र दर्प पसरतो. ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे संबंधित स्मशानभूमी निर्जनस्थळी हलविण्यात यावी.
- शरद शहाणे, स्थानिक रहिवासी, रेल्वे सोसायटी