...अन्यथा २७ गावेआणि पलावामधील नागरिक कर भरणार नाहीत; मनसे आमदार राजू पाटील यांचा इशारा
By मुरलीधर भवार | Published: May 20, 2023 07:07 PM2023-05-20T19:07:34+5:302023-05-20T19:08:14+5:30
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावातील नागरीकांंना मालमत्ता कराची आकारणी दहा पट केली जाते.
मुरलीधर भवार, कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावातील नागरीकांंना मालमत्ता कराची आकारणी दहा पट केली जाते. तसेच पलावा येथील नागरीकांना कर आकारणीत कोणत्याही प्रकारची सवलत अद्याप महापालिकेने जाहिर केलेली नाही. कर आकारणीच्या बाबत फेर विचार व्हावा यासाठी समिती गठीत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. त्याची अंमलबजावणी न करता आयुक्तांनी मालमत्ता कराची थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू केली आहे. जोपर्यंत समिती गठीत करुन प्रशासन कोणताही निर्णय घेत नाही. तोपर्यंत २७ गावे आणि पलावातील नागरीक मालमत्ता कर भरणार नाहीत असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.
महापालिकेने पलावा सिटीमधील सदनिका धारकांना कर सवलत नियमानुसार देण्याची मागणी मनसे आमदार पाटील यांनी केली होती. तर २७ गावातील नागरिकांकडून देखील दहापट कर आकरणीला आमदार पाटील यांनी विरोध केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली २ मे २०२३ रोजी झालेल्या बैठकीत २७ गावातील नागरिकांकडून आकारण्यात येणाऱ्या दहा पट कर आकारणी संदर्भात समिती नेमण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने कर आकारणी करून मालमत्ता कराची बिले पाठवावीत. जेणेकरुन केडीएमसीने जाहीर केलेल्या अभय योजनेचा नागरिकांना फायदा होईल. पालिकेचा थकीत कर देखील वसूल होईल. परंतु तसे न झाल्यास २७ गाव आणि पलावा मधील नागरिक कर भरणार नाहीत असे मनसे आमदार पाटील यांनी सांगितले. या संदर्भात त्यांनी आयुक्तांना एक निवेदनही दिले आहे.