२७ गावातील पथदिव्यांच्या वीजबिलांचा प्रश्न आयुक्तांनी लावला मार्गी
By मुरलीधर भवार | Published: August 11, 2023 05:36 PM2023-08-11T17:36:19+5:302023-08-11T18:09:06+5:30
वीज वितरण कंपनीसोबत बैठक घेऊन वर्षानुवर्ष प्रलंबित असलेली वीज बीलांपाटी थकबाकी १ कोटी ३७ लाख रुपये भरण्याचा निर्णय घेतला आहे.
कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांतील पथ दिव्यांच्या वीजबिलाचा प्रश्न प्रलंबित होता. हा प्रश्न महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी मार्गी लावला आहे.
२७ गावे २०१५ साली महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. २०१५ साली गावे महापालिकेत समाविष्ट केल्यावरही २००२ ते २०१५ या कालावधीतील २७ गावातील पथ दिव्यांच्या थकबाकीचा प्रश्न प्रलंबित होता. आयुक्त दांगडे यांनी वीज वितरण कंपनीसोबत बैठक घेतली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी कल्याण शिळ रोडवरील नविन पथदिवे व्यवस्था केल्यानंतर पथदिवे कार्यान्वित करुन, नागरीकांना सुविधा देण्यासाठी ७ वीज मीटर पोटी असलेली ३४ लाख रुपयांची थकबाकीची रक्कम वीज वितरण कंपनीस भरण्यास मान्यता दिली आहे.
काल वीज वितरण कंपनीसोबत बैठक घेऊन वर्षानुवर्ष प्रलंबित असलेली वीज बीलांपाटी थकबाकी १ कोटी ३७ लाख रुपये भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे २७ गावांतील पथदिव्यांच्या वीज बीलांचा रखडलेला प्रश्न आयुक्तांनी निकाली काढला आहे.
२७ गावांमध्ये सद्यस्थितीत असलेल्या पथदिवे व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि नागरीकांना सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी २७ गावांमध्ये आधुनिक पथदिवे व्यवस्था करणे कामी २७ कोटी ९० लाख रुपये खर्चाचा विद्युत विभागाचा सविस्तर प्रकल्प अहवाल महानगरपालिकेने नगरविकास विभागाकडे सादर केला केला आहे. त्याच्या मंजूरीसाठी महापालिकेकडून सरकार दरबारी पाठपुरावा सुरु आहे.