केडीएमसीच्या उपायुक्तांनी फेरीवाल्यास लाथाडले
By मुरलीधर भवार | Published: April 19, 2024 11:00 PM2024-04-19T23:00:54+5:302024-04-19T23:01:14+5:30
उपायुक्तांच्या विरोधात कारवाई करण्याची पथारी सुरक्षा दलाची मागणी
कल्याण-भर रस्त्यात एका फेरीवाल्यास केडीएमसीच्या उपायुक्तांनी लाथाडल्याच्या आरोप महाराष्ट्र पथरी सुरक्षा दल या संघटटनेने केला आहे. उपायुक्ताच्या विरोधात कारवाई न झाल्यास आम्ही न्यायालयात दाद मागून अशा इशारा कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनास दिला आहे. फेरीवाल्यास मारहाण करताना सीसीटीव्ही संघटनेकडे आहे.
१७ एप्रिल रोजी कल्याण स्टेशन परिसरात अतिक्रमण विरोधी पथकाचे उपायुक्त अवधूत तावडे यांच्याकडून अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जात होती. त्याचवेळी त्याठिकाणी रस्त्याच्या कडेला इरफान कुरेशी हा चष्मे विकणारा फेरीवाला हाेता. तो त्याचा चष्मे विक्रीचा स्टा’ल मागे घेतच होता. त्याच वेळी संतप्त झालेल्या उपायुक्त तावडे यांनी कुरेशी याची गचांडी धरली. त्याला खाली पाडून लाथांनी मारहाण केली. त्याच्या मालाची नासधूस करीत तो जप्त केला.
फेरीवाल्यासोबत उपायुक्तांनी केलेल्या या गैरकृत्याचा महाराष्ट्र पथारी सुरक्षा दलाचे प्रमुख आबासाहेब शिंदे यांनी निषेध व्यक्त केला आहे. उपायुक्तांच्या विरोधात कठाेर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी त्यांचे शिष्टमंडळ आज महापालिका मुख्यालयात आले होते. मात्र मुख्यालयात कोणीही जबाबदार अधिकारी त्यांच्या भेटीसाठी उपलब्ध नव्हता. त्याचे कारण सर्व अधिकारी लाेकसभा निवडणूकीच्या कामात व्यस्त आहे. शिंदे यांनी या प्रकरणी पोलिस उपायुक्तांकडे तक्रार करीत महापालिका उपायुक्तांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. शिंदे यांनी सांगितले , महापालिकेने फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात कुरेशी यांचे नाव आहे. महापालिकेने फेरीवाल्यांचा जागा देण्याचे निश्चीत केले आहे. अद्याप जागा वाटप झालेले नाही. एकीकडे महापालिका फेरीवाल्यांकडून बाजार शुल्क वसूल करते. दुसरीकडे त्यांच्या विरोधात कारवाई करते. त्यांचा विक्रीचा मालही जप्त करते. आत्ता तर कहरच झाला. उपायुक्तांनी थेट फेरीवाल्यास अमानुषपणे मारहाणच केली आहे. यासंदर्भात उपायुक्त तावडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.