हजारो डोंबिवलीकरांच्या नशिबी पुन्हा सक्तीचा अंधार; लोडशेडिंगच्या भीतीने हवालदिल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 02:06 PM2022-04-09T14:06:43+5:302022-04-09T14:07:14+5:30
डोंबिवली : महावितरणच्या १०० केव्ही वीजवाहिनीत गुरुवारी झालेल्या बिघाडामुळे तब्बल १२ तास म्हात्रेनगर, रामनगर आणि आयरे गाव भागातील सुमारे ...
डोंबिवली : महावितरणच्या १०० केव्ही वीजवाहिनीत गुरुवारी झालेल्या बिघाडामुळे तब्बल १२ तास म्हात्रेनगर, रामनगर आणि आयरे गाव भागातील सुमारे नऊ हजार ग्राहकांना फटका बसला. शुक्रवारी सकाळी गोग्रासवाडी, अयोध्यानगरी भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. राज्यातील विजेची मागणी प्रचंड वाढली असून, कोळशाअभावी वीजनिर्मिती घटली असल्याने एप्रिल व मे महिन्यात डोंबिवलीकरांना लोडशेडिंगचे चटके पुन्हा सहन करावे लागणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत.
वीजवाहिनीतील बिघाडामुळे गुरुवारी डोंबिवलीकरांना दीर्घकाळ विजेशिवाय राहावे लागले, अशी माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांनी दिली. केबलमधील बिघाड शोधण्यास वेळ लागल्याने समस्या गंभीर झाली. काम झाल्यावर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वीजवाहिनीची चाचणी करण्यात आली. त्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला, असे बिक्कड यांनी सांगितले. शुक्रवारी सकाळीच गोग्रासवाडी, अयोध्यानगरी भागात काही ठिकाणी वीज खंडित झाली. दीड-दोन तासानंतर पुरवठा सुरळीत झाला. मे महिन्यात पावसाळ्यापूर्वीची देखभालीची कामे महावितरण करते. त्यामुळे वीजपुरवठा बंद ठेवतात. त्यातच आता लोडशेडिंगचीही धास्ती निर्माण झाली आहे.
राज्यात कोळशाअभावी विजेचे संकट गंभीर बनले आहे. केवळ दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक आहे. त्यामुळे वीजसंकट गहिरे झाले तर राज्याच्या ग्रामीण भागाप्रमाणे कल्याण, डोंबिवलीतील वीज ग्राहकांना लोडशेडिंगचा फटका बसणार आहे. काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत आठ-नऊ तासांचे लोडशेडिंग केले जात होते. त्यामुळे नागरिक बेजार झाले होते. इन्व्हर्टरची मागणी प्रचंड वाढली होती. त्यानंतर सरकारने केलेल्या काही उपाययोजनांमुळे तसेच वीज बिलांच्या वसुलीनुसार लोडशेडिंगचे वेळापत्रक ठरविल्यामुळे डोंबिवलीतील अनेक भागातील वसुली वाढून लोडशेडिंग बंद झाले. मात्र यंदा पुन्हा लोडशेडिंग बोकांडी बसणार, अशी भीती कल्याण, डोंबिवलीत व्यक्त होत आहे.
इन्व्हर्टरचा बॅकअपही काही मिनिटांपुरता
- गेल्या काही वर्षांत बत्ती गुल होत नसल्याने अनेकांनी इन्व्हर्टर काढून टाकले किंवा अनेकांकडे असलेल्या इन्व्हर्टरची देखभाल केली नसल्याने, ते काही मिनिटांच्या पलीकडे बॅकअप देत नाहीत.
- परिणामी, गुरुवारी अचानक १२ तास वीज गायब झाल्याने अनेक घरातील सदस्य हे उकाड्याने बेजार झाले. रात्री उशिरापर्यंत वीज न आल्याने त्यांना अंधारात राहावे लागले.
- मेणबत्त्या वगैरे बाळगण्याची गरज नसल्याने अनेकांना दुकानात धाव घ्यावी लागली. दुकानदारांकडेही मेणबत्त्यांचा पुरेसा साठा नव्हता. वीजसंकटामुळे पुन: पुन्हा हा दारुण अनुभव येण्याची चिन्हे दिसत असल्याने डोंबिवलीकरांची पाचावर धारण बसली आहे.