दर दिवसाला आकारला जाणारा ५० रुपयांचा दंड रद्द करण्यात यावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 07:00 PM2024-07-03T19:00:46+5:302024-07-03T19:00:55+5:30
महाराष्ट्र रिक्षा टॅक्सी चालक सेनेची कल्याण आरटीओ कार्यालयावर धडक
कल्याण-ज्या रिक्षा चालाकांनी विहित वेळेत रिक्षाची पासिंग केली नाही. त्यांना आरटीओ कार्यालयाकूडन दर दिवसाला ५० रुपये दंड आकारला जातो. या जाचक दंड रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आज उद्धव सेना प्रणित महाराष्ट्र रिक्षा टॅक्सी चालक सेनेने आरटीओ कार्यालयावर धडक दिली. हा जाचक दंड रद्द केला नाही. तर सर्व वाहने आरटीओ कार्यालयात आणू उभी केली जातील. तीव्र आंदोलन केले जाईल अशा इशारा सेनेचे अध्यक्ष निलेश भोर यांनी आरटीओ अधिकाऱ्यांना दिला आहे.
भोर यांनी आज आरटीओ अधिकारी अशुतोष बारकूल यांची भेट घेतली. त्यांना रिक्षा चालकांच्या मागणीचे निवेदन सादर केले. रिक्षा चालकांनी पाेटाला चिमटा काढून तसेच काही वित्त संस्थांकडून कर्ज घेतले आहे. कोरोना काळात रिक्षा चालकांची हालत खूपच खराब होती. त्यांना कोणतीही मदत सरकारकडून मिळाली नाही. कोरोनानंतर आत्ता कुठे रिक्षा चालक आर्थिक विवंचनेतून थोडाफार सावरत आहे. रिक्षाचे पासिंग आरटीओकडून दरवर्षी करणे बंधनकारक आहे. मात्र ज्या रिक्षा चालकांकडून पासिंगला विलंब होतो. त्यांना त्यांना दर दिवसाला ५० रुपये दंड आकारला जातो. रिक्षा चालकांची स्वत:ची गाडी असली तरी त्याला दिवसभर रिक्षा चालवून पैसे सुटत नाहीत. त्यात इंधन महाग झाले आहे. शाळा सुरु झाल्या असल्याने मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे.
या सगळ्या समस्या पाहता रिक्षा चालकांना दर दिवसाला ५० रुपये दंड आकारणे कितपत योग्य आहे ? असा सवाल भोर यांनी उपस्थित केला आहे. दर दिवसाला आकारला जाणारा ५० रुपयांचा दंड रद्द करण्यात यावा अशी मागणी भोर यांनी आरटीओ अधिकारी बारकूल यांच्याकडे केली आहे हा दंड रद्द केला नाही तर ज्यांना दंड आकारला आहे. ती सर्व वाहने आरटीओ कार्यालयासमोरील आवारात आणून उभी करुन ठेवली जातील. या प्रकारचे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भोर यांनी दिला आहे.