गोळीबाराची कल्पना नव्हती, पण त्यांनी आधीच षडयंत्र रचले होते!- महेश गायकवाड
By प्रशांत माने | Published: February 26, 2024 11:49 PM2024-02-26T23:49:58+5:302024-02-26T23:50:28+5:30
शेवटपर्यंत न्यायालयीन लढाई लढणार, आमदार गोळीबार प्रकरणातील जखमी महेश गायकवाड यांना डिस्चार्ज
प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: मी माझे काम करत होतो. पण गणपत गायकवाड मला प्रतिस्पर्धी मानत होते. मी शेतक-यांच्या न्यायासाठीच प्रयत्न करत होतो. गायकवाड हे माझ्यावर गोळीबार करतील याची कल्पनाही नव्हती पण त्यांनी आधीच षडयंत्र रचले होते. मी आता न्यायालयीन लढाई लढणार मला निश्चितच न्याय मिळेल असे मत शिवसेनेचे कल्याण पूर्वेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी व्यक्त केले.
महेश गायकवाड यांच्यावर २ फेब्रुवारीला उल्हासनगरमधील पोलिस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता. तेव्हापासून जखमी अवस्थेतील महेश यांच्यावर ठाणे ज्युपीटर रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचाराअंती त्यांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला. कल्याणमध्ये आल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदारांनी बिल्डरशी संगनमत करून शेतक-यांची जमीन विकत घेतली होती. पण त्यांची शेतक-यांना पैसे देण्याची मानसिकता नव्हती. शेतक-यांचे पैसे मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करीत होते. आमदार बळजबरीने जमिनीच्या भोवताली कंपाऊंड टाकत होते त्याला मी विरोध केला. त्याठिकाणी वाद झाल्याने या प्रकरणाबद्दल पोलिस ठाण्यात आम्हाला चर्चेसाठी बोलाविण्यात आले. त्याठिकाणी काय घडले हे सर्वांना माहिती आहे याकडे महेश यांनी लक्ष वेधले.
केंद्रीय राज्यमंत्री, मुख्यमंत्र्यांकडेही केली होती तक्रार
कल्याण पूर्वेत आमदारांनी विकास केला नव्हता. पण मी विकासाची कामे सातत्याने करत होतो. तेव्हा वेळोवेळी मला आमदारांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , केंद्रिय राज्यमंत्री कपिल पाटील आणि राज्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार केली होती. पण आपण युतीत आहोत अशी माझी समजूत काढली जायची. गायकवाड मला प्रतिस्पर्धी मानत होते पण मी कार्य करत होतो. पुढेही मी शेवटच्या श्वासापर्यंत माझे काम चालूच राहील असे महेश म्हणाले.
देवाची कृपा म्हणून वाचलो. रूग्णालयात माझ्यावर उपचार करणारे डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय या सर्वांचा मी आभारी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचेही त्यांनी आभार मानले. कल्याणमध्ये येताच त्यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत झाले. त्यांनी तिसाई देवीचे दर्शन देखील घेतले. यावेळी त्यांच्या सोबत गोळीबार प्रकरणात जखमी झालेले त्यांचे सहकारी राहुल पाटील हे देखील होते.