दुकान फोडून लाखो रुपयांचे मोबाईल चोरणारे सराईत चोरटे गजाआड
By प्रशांत माने | Published: April 17, 2023 04:52 PM2023-04-17T16:52:27+5:302023-04-17T16:52:52+5:30
चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
डोंबिवलीः पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसरातील रामनगर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या श्री प्रिया मोबाईल या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी लाखो रुपये किमतीचे ३३ मोबाईल चोरून नेल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली होती. दरम्यान या गुन्हयातील दोघा आरोपींना जेरबंद करण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मोबाईल चोरीप्रकरणी सुंदरम विश्वनाथ गवंडर यांनी दिलेल्या तक्रारीवरून घरफोडीचा गुन्हा नोंद झाला होता. पोलिस ठाण्याच्या नजीक घडलेली ही घरफोडीची घटना चर्चेचा विषय ठरली होती. दरम्यान या गुन्हयाच्या तपासकामी पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे, वरीष्ठ पोलिस निरीक्षक सचिन सांडभोर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बळवंत भराडे, पोलिस उपनिरीक्षक केशव हासगुळे, विजय कांबळे, पोलिस हवालदार सुनिल भणगे, सचिन भालेराव, तुळशीराम लोखंडे, विशाल वाघ , पोलिस नाईक हनमंत कोळेकर, पोलिस शिपाई शिवाजी राठोड, राहुल ठाकूर यांचे पथक गठीत केले गेले होते. चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता. पथकाने सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे १२ तासाच्या आत दोघा चोरट्यांना अटक केली.
फिरोज उर्फ बटला उर्फ राहुल मुन्ना खान ( वय २५) आणि सागर श्याम पारखे ( वय २३) दोघे राहणार देसलेपाडा, डोंबिवली पूर्व अशी अटक आरोपींची नावे आहेत. संबंधित आरोपी मुंबईतील अट्टल गुन्हेगार आहेत. तेथील विविध पोलिस ठाण्यात त्यांच्यावर घरफोडी, चोरी, मारहाणीचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींपैकी फिरोज हा मुंबईतील गुन्हयात फरार होता तर सागर हा तडीपार होता.
नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे
ज्या ठिकाणी ही चोरी झाली तेथील इमारतीच्या सुरक्षारक्षकाने ही चोरी होताना पाहिले होते. त्याने आरडाओरडा केला असता तर घरफोडी झालीच नसती किंवा रस्त्यावरील लोक अथवा रात्रपाळीत व्यवसाय करणारे रिक्षा चालक मदतीला धावले असते आणि चोर पकडले गेले असते परंतु चोरटे हल्ला करतील या भीतीने त्याने शांत राहणे पसंत केले अशीही माहिती तपासात समोर आली आहे. दरम्यान अशा घटनांच्या वेळी प्रसंगानुरूप नागरिकांनी सतर्क रहाणे आवश्यक आहे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.