डोंबिवलीतील श्री संत सावळाराम महाराजांच्या स्मारकाच्या जागेचा प्रश्न लवकरच सुटणार
By मुरलीधर भवार | Published: January 25, 2023 07:00 PM2023-01-25T19:00:23+5:302023-01-25T19:00:32+5:30
स्मारक समितीने घेतली खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांची भेट
कल्याण : श्री संत सावळाराम महाराज स्मारकाच्या जागेचा प्रश्न लवकर सुटणार आहे. या संदर्भात स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याणचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांची काल सायंकाळी मुंबईतील नंदनवन येथे भेट घेतली.
याठिकाणी या विषयावर एक विशेष सभा घेण्यात आली. या सभेला कल्याण डाेंबिवली महापालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे हे उपस्थित हाेते. त्याचबराेबर स्मारक समितीचे अध्यक्ष गुलाब वझे यांच्यासह ठाणे-रायगड वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष चेतन महाराज, सरचिटणीस शरद पाटील आणि सदस्य प्रकाश महाराज, गणेश महाराज,जयेश महाराज, विनीत महाराज ,जनार्दन महाराज व गुरूनाथ म्हात्रे,दिलीप देसले,दिपक पवार यांसह उपस्थित होते. ही सभा घेण्यासाठी कल्याण डाेंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती दीपेश म्हात्रे यांनी विशेष पुढाकार घेतला हाेता.
समितीने महाराजांच्या स्मारकाकरीता मागणी केलेल्या जागेचा प्रश्न लवकर निकाली लावावा म्हणून चर्चा करण्यांत आली. त्याचा संपूर्ण लेखाजोखा मांडत सकारात्मक असे निर्णय घेण्यात आले ज्यामध्ये स्मारकाचे स्वरूप, स्मारक वास्तूमध्ये समाविष्ट असणाऱ्या इतर समजोपयोगी उपक्रम आदी मुद्यावर चर्चा झाली. खासदारांनी हे स्मारक म्हणजे कल्याण-डोंबिवलीची मुख्य ओळख व्हावी अशा स्वरूपाचे असावे, असं आकर्षक, प्रेरणादायी व भव्यच करू अशा शब्दात समितीला ग्वाही दिली. राज्यांच्या प्रधान सचिवांशीही ताबडतोब चर्चा करून आयुक्तांना जागेच्या कायदेशीर बाबी पूर्ण कराव्यात तसेच डोंबिवलीतील प्रख्यात वास्तुविशारद राजीव तायशेटे यांनाही कच्चा आराखडा तयार करावा असे सांगण्यात आले.
सावळाराम महाराजांचे स्मारक हे केवळ स्मारक नसून त्यामध्ये महाराजांचे जीवनचरित्र आणि संतांच्या माहितीसह अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यांत येतील. गुरूकुल पद्धतीने शास्त्रीस संगीत, गायन, वादनासह किर्तन प्रशिक्षण शाळा, भक्तनिवास, वाचनालयासह आरोग्य सुविधा केद्रही उभारण्यांत येईल असे यावेळी सांगण्यात आले.