काटई ते अंबरनाथ फाॅरेस्ट नाक्यापर्यंतचा प्रवास होणार वेगवान, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश
By मुरलीधर भवार | Published: March 2, 2023 05:47 PM2023-03-02T17:47:23+5:302023-03-02T17:47:23+5:30
काटई ते अंबरनाथ या मार्गातील खोणी ते फॉरेस्ट नाका येथील रस्त्याचे लवकरच काँक्रटीकरण होणार आहे.
डोंबिवली - काटई ते अंबरनाथ या मार्गातील खोणी ते फॉरेस्ट नाका येथील रस्त्याचे लवकरच काँक्रटीकरण होणार आहे. या रस्ते कामासाठी एमआयडीसीने ११६ काेटी ६४ लाख रुपयांच्या निविदा जाहीर केल्या आहेत. त्याचबरोबर डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील विको नाका ते डीएनएस जंक्शन रस्त्याचेही काँक्रीटीकरण होणार असून यासाठी ९ काेटी ८२ लाख रुपयांच्या निविदा जाहीर केल्या आहेत.
या काम मार्गी लागण्याकरीता कल्याणचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला आहे.
काटई ते अंबरनाथ या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे. काकोळे येथील वालधुनी नदीवरील पुलाचे बांधकामही करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत या मार्गावरून डोंबिवलीच्या दिशेने जाण्याचा आणि परतीचा मार्ग हा समांतर नसल्याने नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. या पुलाच्या उभारणी नंतर दोन्ही मार्गिका समांतर स्थितीत येणार असून यामुळे नागरिकांच्या प्रवासाचा वेळ वाचणार आहे. त्याचबराेबर डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील विको नाका ते डीएनएस जंक्शन आणि डोंबिवली औद्योगिक क्षेत्राबाहेरील रोटेक्स सेवा रस्त्याचेही काँक्रटीकरण होणार आहे. या रस्त्यावरून सद्यस्थितीत प्रवास करताना नागरिकांना त्रास हाेत हाेता. काटई खोणी रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी २०.४५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून हे कामही शेवटच्या टप्प्यात आहे. या कामासाठी खासदारांनी पाठपुरावा केला आहे. या रस्ते कामांना मंजुरी दिल्याने खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत याचे आभार मानले आहेत.
येत्या दोन वर्षात रस्ते सुस्थितीत होणार
एमआयडीसी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या निविदेद्वारे खोणी ते फॉरेस्ट नाका हा ८ किलोमीटर रस्ता, डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील विको ते डीएनसी हा २ किलोमीटर रस्ता आणि औद्योगिक क्षेत्राबाहेरील रोटेक्स सेवा रस्त्याचे काम येत्या दोन वर्षात पूर्ण केले जाणार आहे. ही कामे झाल्यावर प्रवास सुकर आणि वेगवान हाेणार आहे. त्यामळे नागरीकांना दिलासा मिळणार असल्याची प्रतिक्रिया खासदार शिंदे यांनी व्यक्त केली आहे.