मुंब्रा, घाटकोपर येथील रिक्षा चोरणारा गजाआड; तीन रिक्षा जप्त
By प्रशांत माने | Published: December 31, 2023 02:34 PM2023-12-31T14:34:47+5:302023-12-31T14:34:55+5:30
कल्याण गुन्हे अन्वेषणची कामगिरी, दोन घाटकोपर पंतनगर येथून तर एक रिक्षा मुंब्रा येथून चोरली होती
डोंबिवली: मुंब्रा आणि घाटकोपर येथील रिक्षा चोरणा-या सराईत चोरटयास कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. चोरलेल्या रिक्षांच्या नंबरप्लेटवरील क्रमांक खाडाखोड करून त्या विकण्याचा त्याचा डाव होता. परंतु तत्पुर्वीच पोलिसांनी सापळा लावून त्याला जेरबंद केले. दिनेश जयवंत शिंगोळे ( वय ३१) रा. अंबरनाथ, भालगाव असे अटक आरोपीचे नाव आहे. तो स्वत: रिक्षाचालक आहे.
‘ऑपरेशन ऑल आऊट’ या अभियानांतर्गत परिमंडळ ३ कल्याण हद्दीत मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस गस्त घालत असताना पोलिस कॉन्स्टेबल गोरक्ष शेकडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, एक व्यक्ती चोरी केलेली रिक्षा त्यावरील नंबरप्लेट क्रमांक खाडाखोड करून डोंबिवली पूर्वेकडील काटई नाका येथे उभा आहे.
या मिळालेल्या माहितीनुसार वरीष्ठ पोलिस निरिक्षक नरेश पवार, सहाय्यक पोलिस निरिक्षक संदिप चव्हाण, पोलिस उपनिरिक्षक संजय माळी, पोलिस हवालदार विश्वास माने, प्रशांत वानखेडे, अनुप कामत, पोलिस नाईक दिपक महाजन, पोलिस कॉन्स्टेबल गुरूनाथ जरग, गोरक्ष शेकडे, मिथुन राठोड आदिंचे पथक काटई नाका येथे दाखल झाले आणि सापळा लावला. माहिती देताना केलेल्या वर्णनावरून पोलिसांनी दिनेशला रिक्षासह ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करता त्याच्याकडे चोरी केलेल्या एकुण तीन रिक्षा आढळुन आल्या. दोन घाटकोपर पंतनगर येथून तर एक रिक्षा मुंब्रा येथून चोरली होती. त्याच्याकडून तीन रिक्षा आणि एक मोबाईल असा २ लाख २ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.