कल्याणमधील मनसेच्या शाखेवर कारवाईसाठी गेलेले केडीएमसीचे पथक माघारी परतले, कारण...
By मुरलीधर भवार | Published: August 8, 2024 08:08 PM2024-08-08T20:08:45+5:302024-08-08T20:09:01+5:30
मनसेच्या पदाधिकाऱ्याने विरोध केल्याने कारवाई पथकाला कारवाई न करताच रिकाम्या हाती परतावे लागले.
मुरलीधर भवार, कल्याण : शहराच्या पूर्व भागातील कोळसेवाडी परिसरातील म्हसोबा चौकानजीक असलेल्या मनसेच्या शाखेवर कारवाई करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापलिकेचे पथक पोहचले. मात्र या कारवाईस मनसेच्या पदाधिकाऱ्याने विरोध केल्याने कारवाई पथकाला कारवाई न करताच रिकाम्या हाती परतावे लागले.
कोळसेवाडी परिसरात मनसेची शाखा आहे. त्याठिकाणी मनसेने अतिक्रमण केलेले नाही. शाखेत ज्येष्ठ नागरीकांकरीता बसण्यासाठी कट्टा आहे. या शाखेवर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे कारवाई पथक आज सायंकाळी आले. ही माहिती कळताच मनसेचे पदाधिकारी योगेश गव्हाणे यांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यांनी कारवाईस विरोध केला. गव्हाणे यांनी सांगितले की, मनसेची शाखेचा कोणाला अडसर नाही. याच शाखेच्या मागच्या बाजूला अन्य काही बेकायदेशीर गोष्टी उभ्या ठाकल्या आहेत. त्यावर महापालिकेचा जेसीबी चालविला जात नाही. मनसेच्या शाखेला प्रशासन कोणत्या तरी राजकीय पक्षाच्या सांगण्यावरुन लक्ष्य करीत आहे. त्या विरोधात महापालिका आयुक्तांनी आधी कारवाई करावी. कोणाच्या तरी सांगण्यावरुन मनसेच्या शाखेला लक्ष्य केले जात असल्यास मनसे प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा गव्हाणे यांनी दिला आहे.
महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त सविता हिले यांनी सांगितले की, आम्ही मनसे शाखेवर कारवाई करण्यासाठी गेलो नव्हतो. त्याठिकाणी असलेल्या बेकायदा शेडवर कारवाई करणार होतो. आज विराेध झाल्याने ही कारवाई पुढे ढकलण्यात आली आहे.