महाविकास आघाडीचं सरकार आमच्या मागण्यांची दखलच घेत नव्हतं; राजू पाटलांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 02:16 PM2022-10-24T14:16:14+5:302022-10-24T14:20:01+5:30
राज ठाकरेंनी युतीसाठी होकार दिल्यास आम्हीही त्यासाठी तयार असू, असं विधानही राजू पाटील यांनी यावेळी केलं.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप- शिंदे सेना व मनसे अशी युती होणार असल्याची चर्चा आहे. त्यातच राज ठाकरे यांनी केलेल्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देण्याची भूमिका शिंदे, फडणवीस यांनी घेतल्याचे अलीकडे दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर आज मनसेचे आमदार राजू पाटील यांनी युतीवर भाष्य केलं आहे.
राजू पाटील यांनी आज डोंबिवली येथील फडके रोडवरील गणेश मंदिरात दर्शन घेतलं. त्यानंतर दिवाळी पहाट या कार्यक्रमात सहभागी होत कल्याण-डोंबिवलीकरांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमानंतर राजू पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. हे सरकार आम्ही दिलेल्या सूचना ऐकतं. त्यानुसार काम करतं. अशी कामे होत असताना जर जवळीक होत असेल तर त्यातून वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही, असं राजू पाटील म्हणाले.
आम्ही काही सत्तेत नाही. सत्तेत बसायच्या आधी आम्ही भाजपला मतदान केलं होतं. आम्ही सरकारला पाठिंबा दिलेला आहे. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत, असंही राजू पाटील यांनी सांगितले. मागील सरकारमध्ये कोणी आमच्या मागण्यांची दखलच घेत नव्हते. एखादी मागणी केली की, तर ती मागणी पूर्ण कशी होणार नाही, याकडे जास्त लक्ष दिले जात होते, अशी टीकाही राजू पाटील यांनी महाविकास आघाडीवर केली. त्याचप्रमाणे राज ठाकरेंनी युतीसाठी होकार दिल्यास आम्हीही त्यासाठी तयार असू, असं विधानही राजू पाटील यांनी यावेळी केलं.