'मी नरकातून बोलतोय' हिंदी व्यंगकथांचा मराठी अनुवाद प्रसिद्ध
By अनिकेत घमंडी | Published: June 10, 2024 02:52 PM2024-06-10T14:52:36+5:302024-06-10T14:52:50+5:30
अलका अग्रवाल यांनी जेष्ठ हिंदी व्यंगलेखक स्व.हरिशंकर परसाईंच्या आठवणीना उजाळा दिला.
डोंबिवली: अनुवाद हा दोन भाषांना जोडणारा पूल आहे, असे साहित्यिक, अभ्यासक शीतला प्रसाद दुबे म्हणाल्या. कल्याण येथील श्री राम मारुती मंदिरात, 'मी नरकातून बोलतोय' ह्या हिंदी व्यंगकथांचा मराठी अनुवाद प्रसिद्ध झाला. त्यावेळी कार्यक्रमाला महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमी कार्याध्यक्ष दुबे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्यानिमित्ताने अनुवादक भाऊ काळकर यांनी हिंदी व्यंगलेखक स्व.शंकर पुणतांबेकर यांच्या आठवणी सांगितल्या.
अलका अग्रवाल यांनी जेष्ठ हिंदी व्यंगलेखक स्व.हरिशंकर परसाईंच्या आठवणीना उजाळा दिला. डॉक्टर श्यामसुंदर पांडेय यांनी व्यंग साहित्यावर विवेचन केले. गीताई काळकर यांनी स्वागत पर भाषणात पुस्तकाचे लिखाण ते प्रकाशन याचा प्रवास सांगितला. दीप प्रज्वलनाने व सरस्वती वंदनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. मराठी भाषिक नाटकवेडे व साहित्यात रुची ठेवणारे आहेत. कल्याण डोंबिवलीत मराठी संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने विविध स्तरावर काम होत आहे. विविध भारतीय भाषांतील अनुवाद इतर भाषांमध्ये होणे आवश्यक आहे.
या पुस्तकाच्या निमित्ताने करण्यात आलेला अनुवाद हा अत्तराच्या बाटली सारखा सर्वत्र सुगंध पसरवत असल्याचे त्या म्हणाल्या. साहित्यिक प्रविण देशमुख यांनी पुस्तकातील 'मी नरकातून बोलतोय 'ही कथा साभिनय सादर केली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन आनंद सिंग यांनी केले. त्यांच्या खुमासदार शैलीत वक्त्यांची ओळख करून देताना साहित्याचे विवेचन केले. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ कल्याण तर्फे अनुवादक काळकर यांचा सत्कार करण्यात आला.