गहाळ झालेले मंगळसूत्र रामनगर पोलिसांच्या प्रयत्नाने परत
By प्रशांत माने | Published: January 2, 2024 06:53 PM2024-01-02T18:53:08+5:302024-01-02T18:54:04+5:30
तक्रार दाखल होताच अवघ्या तासाभरात दिले शोधून
प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: रिक्षामधून प्रवास करताना एका महिलेचे गहाळ झालेले १५ ग्रॅम वजनाचे ९० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र रामनगर पोलिसांनी तक्रार दाखल होताच तासाभरात शोधून दिले. मंगळसूत्र सापडताच संबंधित महिलेचा जीव भांडयात पडला.
डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली टेकडी परिसरात राहणा-या निमिषा बांधवलकर या सोमवारी सकाळी ९.३० ते ९.४५ या कालावधीत पती निलेश यांच्या समवेत नांदिवली ते डोंबिवली रेल्वे स्थानक दरम्यान प्रवास करताना त्यांच्या गळयातील मंगळसूत्र गहाळ झाले. मंगळसूत्र कुठेतरी गहाळ झाल्याचे निमिषा यांना दुपारी १२ च्या सुमारास समजले. त्यांनी लागलीच याबाबतची तक्रार रामनगर पोलिस ठाण्यात केली.
तक्रार दाखल होताच वरीष्ठ पोलिस निरिक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक योगेश सानप, पोलिस हवालदार प्रशांत सरनाईक, पोलिस शिपाई नितीन सांगळे, देविदास पोटे यांनी तपासाला सुरूवात केली. त्यांनी ज्या रिक्षातून बांधवलकर दाम्पत्य प्रवास करीत होते. त्या रिक्षाचा सीसीटिव्हीच्या आधारे तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेतला आणि रिक्षात पडलेले मंगळसूत्र रिक्षाचालकाकडून हस्तगत केले आणि निमिषा यांचे पती निलेश यांच्याकडे ते सुपूर्द केले. तक्रार दाखल होताच हरवलेले मंगळसूत्र तासाभरात मिळवून दिल्याबाबत सानप आणि त्यांच्या पथकाचे बांधवलकर यांनी आभार मानले.