मित्रावर गोळी झाडणाऱ्याला अवघ्या २४ तासांत अटक, कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी
By मुरलीधर भवार | Published: October 5, 2023 05:05 PM2023-10-05T17:05:44+5:302023-10-05T17:07:12+5:30
गोळी झाडणाऱ्यास कल्याण गुन्हे अन्वषेण शाखेच्या पोलिसांनी अवघ्या २४ तासात अटक केली आहे.
कल्याण-कल्याणनजीकच्या मोहने आंबिवली परिसरातील बंदरपाडा भागात चार मित्राची दारु पार्टी सुरु होती. या वेळी एका मित्राने सुशिलकुमार महंतो याच्यावर गोळी झाली. त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोळी झाडणाऱ्यास कल्याण गुन्हे अन्वषेण शाखेच्या पोलिसांनी अवघ्या २४ तासात अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव उमेश प्रमोद खानविलकर असे आहे. जुन्या वादातून त्याने सुशिलवर गोळी झाडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र त्यांच्यामध्ये वाद काय होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास खडकपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस करीत आहेत.
बंदरपाडा परिसरात सोमनाथ म्हात्रे या व्यक्तीच्या घरात चार मित्र जमा झाले. हे चौघे पार्टीसाठी जमा झाले होते. पार्टी सुरु असताना उमेश खानविलकर नावाच्या तरुणाने मजामस्तीत बंदूकीतून त्याचा मित्र सुशिलकुमार महंतो यांच्या दिशेने गोळी झाली. त्यावेळी सुशीलकुमार याने हात आडवा केला. तेव्हा झाडलेली गोळी त्याच्या हाताच्या पंजाला भेदून त्याच्या तोंडात गेली. गोळीने त्याची जीभ फाडली. त्याच्या घशात ही गोळी अडकल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु आहे.
गोळीबार करुन उमेश खानविलकर हा पसार झाला होता. कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक किशोर शिरसाट यांच्या यांच्या पथकाने उमेश खानविलकरला शहाड रेल्वे स्थानकातून अटक केली आहे. उमेश हा लोकल ट्रेन पकडून मुंबईच्या दिशेने पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याआधीच पोलिसांनी त्याला पकडले. उमेशने ज्या बंदूकीती गोळी झाडली. ती बंदूक त्याला त्याच्या मित्रानेच दिली अशी माहिती त्याने पोलिसांना सांगितली आहे. मात्र त्याने ही बंदूक नक्की कोणाकडून घेतली. त्याला कोणी दिली. याचा तपासही खडकपाडा पोलिसांकडून केला जाणार आहे.