जागा आमचीच! त्या वादग्रस्त जागे प्रकरणी बिल्डर आणि शेतकऱ्यांचा दावा; सरकारने न्याय द्यावा
By मुरलीधर भवार | Published: September 3, 2024 05:28 PM2024-09-03T17:28:59+5:302024-09-03T17:29:11+5:30
शेतकरी एकनाथ जाधव यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की, जागा आमची आहे. या जागेवरुन पोलिस ठाण्यात गोळीबार झाला होता.
कल्याण-कल्याण मलंग रोडनजीक असलेल्या द्वारली येथील वादग्रस्त जागे प्रकरणी सर्वेक्षण सुरु असताना बिल्डर आणि शेतकरी यांच्यात सोमवारी झालेल्या वादा प्रकरणी उल्हासनगर हिललाईन पोलिस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बिल्डर आणि शेतकरी यांनी जागा आमच्याच मालकीची असल्याचा दावा केला असून सरकारने आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.
याच वादग्रस्त जागे प्रकरणी फेब्रुवारी २०२४ मध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर हिललाईन पोलिस ठाण्यात गोळीबार केला होता. या प्रकरणी आमदार गायकवाड हे सध्या जेलमध्ये आहेत. काल या जागेचा सर्वे सुरु असताना शेतकरी आणि बिल्डर जितेंद्र पारिख यांच्या माणसात जोरदार वाद झाला. जागेवर हत्यारे देखील मिळून आली होती.
शेतकरी एकनाथ जाधव यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की, जागा आमची आहे. या जागेवरुन पोलिस ठाण्यात गोळीबार झाला होता. आत्ता सर्वे करुन जागा लाटली जात आहे. सरकारने या प्रकरणी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी आहे.
या प्रकरणात जखमी बिल्डर जितेंद्र पारीख यांच्यावर कल्याणच्या खाजगी रुग्णलयात उपचार सुरु आहे. बिल्डर पारिख यांचे म्हणणे आहे की, या जागेबाबत न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने आहे. काल जोगवर सर्वे करण्यासाठी गेलो होते. त्याठिकाणी महेश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांनी सर्वेला विरोध केला. त्यांच्याकडे गन होती. आमच्या सोबत दादागिरी केली गेली. आम्हाला मारहाण करण्यात आली . आमच्याकडे हत्यारे नव्हती. तर आमच्या खाजगी सुरक्षा रक्षकांकडे लायसन्सधारी गन होती. जागेविषयी कोणताही विवाद नाही. जागा आमचीच आहे. या जागेचा जो काही मोबदला आहे. तो दिला आहे. आम्ही गुंड बोलविले नाही. महेश गायकवाड हे गुंडगिरी करीत असून त्यांनी खंडणी मागितली आहे. आम्ही जातीवाचक शिविगाळ केलेली नाही. एकच जागा तीन वेळा विकल्या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी सरकारने आम्हाला न्याय द्यावा.
या प्रकरणी महेश गायकवाड यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, जागा शेतकऱ्यांची आहे. त्यांच्यासोबत दादागिरीकरुन जागा लाटली जात आहे. आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. शेतकऱ्यांना आम्ही न्याय मिळवून देणार. बिल्डरने आमच्यावर केलेला खंडणीचा आरोप निराधार आणि खोटा आहे.