घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यांना पोलिसांनी केली अटक, आठ लाखाचा मुद्देमाल हस्तगत
By मुरलीधर भवार | Published: August 18, 2022 03:25 PM2022-08-18T15:25:26+5:302022-08-18T15:26:04+5:30
चोरट्यांकडून आठ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी केला हस्तगत.
मुरलीधर भवार
कल्याण-घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यांना महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सात गुन्ह्याची उकल झाली असून अटक करण्यात आलेल्या चोरट्यांकडून आठ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
कल्याणच्या चिकनघर येथील एका मिठाईच्या दुकानात चोरट्यांनी घरफोडी करुन 32 हजार रुपयांचा ऐवज लूटला होता. या तपासाकरीता पोलिसांनी दोन पथके तयार केली होती. पोलिसांनी या गु्न्ह्यात मोहंमद करीम उर्फ लाडो अख्तरअली बागवान याला प्रथम अटक केली. त्याने चोरी केलेल्या रक्कमेपैकी त्याच्याकडून सात हजार रुपये हस्तगत केले. या गुन्हयातील त्याचा साथीदार साकीर जाकीर खान यालाही पोलिसांनी अटक केली.
साकीर याच्याकडूनही पोलिसांनी चोरीस गेलेली पाच हजार रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे. साकीर याची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने अन्य एका गुन्ह्याची कबूली दिली. या घरफोडीच्या गुन्ह्यात त्याला शिवम महेंद्र बतमा उर्फ मच्छी, शंकर उर्फ अक्षय विष्णू पडधने याची साथ होती. या सर्वांना महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत या चोरट्यांनी सात गुन्हे केले आहे. त्यांच्याकडून आठ लाख रुपये किंमतीचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. हे सर्व गुन्हेगार सराईत आहे. त्यांच्या विरोधात अंबरनाथ, उल्हासनगर मध्यवर्ती, विक्रोळी आणि महात्मा फुले पोलिस ठाण्यात 9 गुन्हे दाखल आहेत.