कल्याण मनसेची धूरा पुन्हा प्रकाश भोईरांकडे; डोंबिवलीपाठोपाठ कल्याणचेही शहरअध्यक्ष बदलले
By प्रशांत माने | Published: January 12, 2024 05:12 PM2024-01-12T17:12:06+5:302024-01-12T17:13:09+5:30
२००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत ते कल्याण पश्चिम मतदारसंघातून निवडून आले होते. २०१५ मध्येही भोईर यांच्याकडे शहरअध्यक्षपदाची जबाबदारी दिली गेली होती
कल्याण: डोंबिवलीपाठोपाठ कल्याण शहराचे शहरअध्यक्ष देखील मनसेकडून बदलण्यात आले आहेत. कल्याण मनसे शहरअध्यक्षपदाची धूरा माजी आमदार तथा पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश भोईर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने मनसेकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. ऑक्टोबर महिन्यात डोंबिवली शहरअध्यक्षपदाची धूरा केडीएमसीचे शिक्षण मंडळाचे माजी सदस्य राहुल कामत यांच्याकडे सोपविली होती तर शुक्रवारी कल्याण शहरअध्यक्षपदाची जबाबदारी तिस-यांदा माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यावर सोपविली आहे. २००६ ला मनसे पक्षाची स्थापना झाल्यावर कल्याणचे पक्षाचे पहिले शहरअध्यक्ष म्हणून भोईर यांनी २००९ पर्यंत जबाबदारी सांभाळली होती.
२००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत ते कल्याण पश्चिम मतदारसंघातून निवडून आले होते. २०१५ मध्येही भोईर यांच्याकडे शहरअध्यक्षपदाची जबाबदारी दिली गेली होती. दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भोईर यांच्याकडे शहरअध्यक्षपदाची धूरा सोपवून मनसेने भाकरी फिरवली असल्याची चर्चा आहे.