कल्याण पूर्वेतील लोकग्राममधील नाल्याची संरक्षक भिंत बांधण्याचा प्रश्न अधांतरीच
By मुरलीधर भवार | Published: February 15, 2024 05:20 PM2024-02-15T17:20:15+5:302024-02-15T17:21:21+5:30
कल्याण पूर्वेतील लोकग्राम येथील मोठ्या नाल्याची संरक्षक भिंत गेल्या पावसाळ्यात पडली आहे. ही भिंत पुन्हा बांधण्यात आलेली नाही.
मुरलीधर भवार, कल्याण : पूर्वेतील लोकग्राम येथील मोठ्या नाल्याची संरक्षक भिंत गेल्या पावसाळ्यात पडली आहे. ही भिंत पुन्हा बांधण्यात आलेली नाही. नाल्याची भिंत कोसळली आहे. तर नाल्यालगतच्या फूटपाथवरुन शाळकरी मुले ये जा करतात. भिंत नसल्याने एखादा विद्यार्थी नाल्यात पडून अपघात हाेऊ शकतो अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाळ्या पूर्वी ही संरक्षक भिंत बांधण्यात यावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांच्याकडे केली आहे.
लोकग्रामचा नाला मोठा आहे. हा नाला कल्याण खाडीला जाऊन मिळतो. लोकग्रामही सुनियोजित लोकवसाहत आहे. या लोकवस्तीतून जाणाऱ््या रस्त्याचे विकास काम सध्या एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरु आहे. या रस्ते विकास कामावर जवळपास १० कोटी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. रस्त्याचे विकास काम सुरु असल्याने नागरीक आणि विशेषत: शाळकरी मुले नाल्यालगत असलेल्या फूटपाथवरुन ये जा करतात.
नाल्याची संरक्षक भिंत गेल्या पावळ्यात काेसळली आहे. संरक्षक भिंत नसल्याने नाल्याच्या फूटपाथवरुन ये जा करणारे विद्यार्थी नाल्यात पडून अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. ही भिंत महापालिकेने बांधणे गरजेचे आहे. मात्र रस्त्याचे काम एमएमआरडीए करीत असल्याने हे काम एमएमआरडीएने करावे असे महापालिकेचे म्हणणे आहे. तर एमएमआरडीएनेकडून सांगितले जात आहे की, त्यांची केवळ रस्ता विकसीत करण्याची जबाबदारी आहे.
संरक्षक भिंत बांधणे हे महापालिकेचे काम आहे. या वादात संरक्षक भिंत बांधण्याचा विषय अधांतरीच आहे. शाळकरी मुले आणि पादचारी यांच्या जिवित सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता महापालिकेने ही संरक्षक भिंत पावसाळ्यापूर्वी बांधावी अशी मागणी माजी नगरसेवक शेट्टी यांनी महापालिका आयुक्त जाखड यांच्याकडे केली आहे.