कमी मतदानाचा ‘विक्रम’ मतदारांनी मिरवला

By मुरलीधर भवार | Published: May 21, 2024 02:22 PM2024-05-21T14:22:45+5:302024-05-21T14:23:13+5:30

कल्याण, डोंबिवली व त्या लगतच्या भागात सुशिक्षित मतदार वास्तव्य करतात. मतदानाच्या दिवशी येथील नोकरदार वर्गाला सुट्टी असते किंवा दोन ते तीन तास उशिरा येण्याची मुभा असते.

The 'record' of less voting was by the voters | कमी मतदानाचा ‘विक्रम’ मतदारांनी मिरवला

कमी मतदानाचा ‘विक्रम’ मतदारांनी मिरवला

कल्याण : मागील लोकसभा निवडणुकीत ४८.०५ टक्के मतदान झाल्याने देशात दुसऱ्या क्रमांकाचे कमी मतदान करणारा मतदारसंघ असा ‘विक्रम’ येथील मतदारांनी नोंदवला होता. यावेळी सायंकाळी ५ वाजेपर्यंत कल्याण मतदारसंघात ४१.७० टक्के मतदान झाले असल्याने मागील निवडणुकीपेक्षा कमी मतदान करून मतदानात पिछाडीवर राहण्याचा ‘विक्रम’ पुन्हा येथील मतदार नोंदवणार आहेत. अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून गायब होणे, अत्यंत संथ गतीने सुरू असलेल्या मतदानामुळे मतदान केंद्रांवर तासनतास तिष्ठत राहावे लागणे, या निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभाराने मतदारांच्या निरुत्साहात भर घातल्यानेच कल्याण मतदारसंघात कमीतकमी मतदान झाले.

कल्याण, डोंबिवली व त्या लगतच्या भागात सुशिक्षित मतदार वास्तव्य करतात. मतदानाच्या दिवशी येथील नोकरदार वर्गाला सुट्टी असते किंवा दोन ते तीन तास उशिरा येण्याची मुभा असते. मात्र, मागील दोन-तीन निवडणुकांतील मतदानाची टक्केवारी पाहिली तर येथील सुशिक्षित मतदार मतदानाबाबत अतिशय निरुत्साही आहेत. अनेक मतदार सुट्टी लागल्याने बाहेर निघून जातात. सोमवारी सकाळपासून कल्याणमधील काही भागात मतदार मतदानासाठी घराबाहेर पडले. मात्र, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, डोंबिवली येथील अनेक भागातील मतदारांची नावे मतदार यादीतून गायब होती. कल्याण पश्चिमेतील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रातील मतदान केंद्रावर शेकडो मतदारांनी जाऊन तेथील निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारला. मात्र, त्यांच्याकडे याचे उत्तर नव्हते. डोंबिवलीत ज्या ज्येष्ठ नागरिक असलेल्या मतदारांकडे निवडणूक आयोगाची जुनी ओळखपत्रे आहेत, त्यांची एका विशिष्ट सिरीजमधील नावे यादीतून गायब असल्याचे स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांनी सांगितले. याबाबत निवडणूक विभाग समाधानकारक स्पष्टीकरण देत नसल्याचे त्यांनी सांगितले.

उन्हाळा, घामाच्या धारा, तीन तासांची प्रतीक्षा
प्रचंड उन्हाळा, घामाच्या धारा आणि मतदान केंद्रांवर किमान दोन ते तीन तासांची प्रतीक्षा अशा परिस्थितीमुळे अनेक मतदार हे मतदान केंद्रांवर जात होते. परंतु, येथे आपल्याला मतदानाला दीर्घकाळ लागेल हे लक्षात येताच तेथून माघारी जात होते. 
८४ वर्षांच्या आजींना केले मृत घोषित
उल्हासनगरातील सुभाष टेकडी येथील सुमित्रा टाले या ८४ वर्षीय आजींना निवडणूक यंत्रणेने मृत घोषित केले होते. त्या मतदानाला गेल्या तेव्हा ही नोंद पाहून त्यांना धक्का बसला. आपण जिवंत असून मतदान केल्याखेरीज जाणार नाही, असा पवित्रा टाले यांनी घेतल्याने निवडणूक विभागाने त्यांना मतदान करू दिले.
पोई आदिवासी गावाचा बहिष्कार
पोई या आदिवासी पाड्याला रस्त्याने जोडण्यात न आल्याने या आदिवासी पाड्यावरील मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातला. 

Web Title: The 'record' of less voting was by the voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.