कल्याण खाडी गणेश घाटाकडे जाणारा रस्ता गणेशोत्सवापूर्वी खुला केला जाईल; केडीएमसी आयुक्तांनी केली पाहणी
By मुरलीधर भवार | Published: August 24, 2023 08:14 PM2023-08-24T20:14:52+5:302023-08-24T20:15:09+5:30
कल्याण खाडीला लागूनच स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत आरमार स्मारकाचे काम सुरु आहे.
कल्याण- कल्याण पश्चिमेतील खाडी परिसरात असलेल्या गणेश घाटाकडे जाणारा रस्ता बंद आहे. हा रस्ता गणेशोत्सवापूर्वी खुला केला जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी दिली आहे. आज सायंकाळी आयुक्तांंनी गणेश घाट परिसराची पाहणी केली.
या पाहणीच्या वेळी शिंदे गटाचे कल्याण पश्चिम शहर प्रमुख रवी पाटील, पदाधिकारी अरविंद मोरे, पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक आयुक्त कल्याण कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने, सर्जेराव पाटील, सुनिल पवार, वाहतूक शाखेचे पोलिस निरिक्षक गिरीष बने आदी यावेळी उपस्थित हाेते.
कल्याण खाडीला लागूनच स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत आरमार स्मारकाचे काम सुरु आहे. नेव्हल संग्रहालय तयार केले जात आहे. त्यामुळे याठिकाणी जाण्या येण्याचा रस्ता बंद होता. ही बाब निदर्शना आल्यावर गणेश घाटाकडे जाणारा रस्ता गणेशोत्सवापूर्वी खुला करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांना आज पाहणी पश्चात आयुक्तांनी दिल्या आहेत. गणेश घाटाकडे जाणाऱ््या रस्त्यावर मोठा खड्डा झाला आहे. तो खड्डा देखील तातडीने बुजविण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित अभियंत्यांना दिले आहेत.
गणेश विसर्जनासाठी कोळी बांधवांची मदत होते. मात्र त्यांना मानधन मिळत नाही. या प्रश्नाला उत्तर देताना आयुक्तांनी सांगितले की, गणेश विसर्जन करण्याच्या कामाकरीता महापालिका टेंडर काढते. हे काम ठेकेदाराला दिले जाते. त्या टेंडरमध्ये तशी तरतूद करुन ठेकेदाराला सांगितले जाईल. कोळी बांधवांच्या मानधनाच्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.