पगारात भागत नाही, म्हणून पत्करला चोरीचा मार्ग
By प्रशांत माने | Published: February 2, 2023 07:44 PM2023-02-02T19:44:36+5:302023-02-02T19:45:47+5:30
डोंबिवली शहरात दुचाकी आणि रिक्षा चोरीचे गुन्हे सातत्याने घडत आहेत. पश्चिमेकडील विष्णुनगर पोलिस ठाण्यात रिक्षा चोरीचे दोन गुन्हे दाखल झाले होते.
डोंबिवली - एका रिकव्हरी कंपनीत काम करणाऱ्या एजंटने पगारात भागत नाही, म्हणून चोरीचा मार्ग अवलंबिल्याचे एका घटनेतून समोर आले. रिक्षा चोरीच्या गुन्ह्यात त्याला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली असून रिक्षाची चोरी करून त्या भाडेतत्वावर लावण्याचा त्याचा विचार होता. त्याच्याकडून चोरीच्या दोन रिक्षा जप्त केल्या आहेत. सुरज राजकुमार पाल (वय २७) असे अटक आरोपीचे नाव आहे.
डोंबिवली शहरात दुचाकी आणि रिक्षा चोरीचे गुन्हे सातत्याने घडत आहेत. पश्चिमेकडील विष्णुनगर पोलिस ठाण्यात रिक्षा चोरीचे दोन गुन्हे दाखल झाले होते. त्या गुन्हयाच्या तपासकामी वरीष्ठ पोलिस निरिक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक नेमण्यात आले होते. दरम्यान या पथकाला सीसीटिव्ही फु टेज आणि गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहीतीवरून या दोन्ही गुन्हयातील आरोपी सुरजला शोधून बेडया ठोकण्यात यश आले. त्याला बुधवारी कल्याण पूर्वेतील हाजीमलंग रोडवरील भालगाव परिसरातून अटक करण्यात आली. चौकशीत त्याने रिक्षांची चोरी केल्याची कबुली दिली. सूरज हा एका कंपनीत रिकव्हरी एजंटचे काम करतो मिळणा-या पगारात भागत नाही म्हणून चोरलेल्या रिक्षा भाडयावर देऊन त्यातून अधिकचे उत्पन्न मिळविणार होतो असे त्याने पोलिस चौकशीत सांगितल्याची माहीती भालेराव यांनी दिली. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.