शिक्षकांनी स्वत: कार्यकुशल होऊन विद्यार्थ्यांना आत्मविश्वास द्यावा - आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़
By प्रशांत माने | Published: June 19, 2024 01:55 PM2024-06-19T13:55:00+5:302024-06-19T13:55:22+5:30
शासनाचे नवीन शैक्षणिक धोरण या शैक्षणिक वर्षापासून सर्वत्र लागू होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण देणेकामी शैक्षणिक सत्राचे आयोजन नुकतेच महापालिकेच्या प्र.के.अत्रे रंगमंदिरात केले होते.
कल्याण: विद्यार्थी हा आपल्या शिक्षकांशी जास्तीत जास्त जवळ असल्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या दृष्टीकोनातून प्रयत्नशील राहावे. शिक्षकांनी स्वत: कार्यकुशल होऊन विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केडीएमसीच्या आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी केले.
शासनाचे नवीन शैक्षणिक धोरण या शैक्षणिक वर्षापासून सर्वत्र लागू होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण देणेकामी शैक्षणिक सत्राचे आयोजन नुकतेच महापालिकेच्या प्र.के.अत्रे रंगमंदिरात केले होते. त्यावेळी उपस्थित शिक्षक वर्गाला संबोधित करताना आयुक्त जाखड़ यांनी हे प्रतिपादन केले. चर्चा सत्राच्या सुरूवातीला बदलते शैक्षणिक धोरण व त्यामुळे विद्यार्थ्यांना भेडसावणारे प्रश्न याबाबतची माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्त धैर्यशील जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. आपण ज्ञानप्रचुर असणे व विद्यार्थी घडविणे, हे शिक्षकांचे सर्वात महत्वाचे काम आहे, असेही विचार त्यांनी मांडले.
यावेळी व्यासपीठावर महापालिकेच्या कार्यकारी अभियंता रोहीणी लोकरे, शिक्षण अधिकारी व्ही. व्ही. सरकटे उपस्थित होते. ‘शिक्षणाची नवी दिशा’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवून आयोजित केलेल्या शैक्षणिक सत्रात विविध क्षेत्रातील मान्यवर तज्ञांचे मार्गदर्शन लाभले. यात मुंबई विदयापीठाचे माजी कुलगुरू आणि बिर्ला महाविद्यालयाचे डॉ.नरेश चंद्र यांनी नविन शैक्षणिक धोरणाबाबत सखोल माहिती उपस्थित शिक्षक वर्गास दिली आणि या चर्चासत्राचे आयोजन केल्याबद्दल महापालिका आयुक्तांचे आभार मानीत, महापालिकेच्या शाळा या शहरासाठी अभिमान ठराव्यात अशा आशावाद व्यक्त केला.
आर के टी महाविद्यालयाच्या माधवी निकम यांनी सामाजिक संस्थाद्वारे (ग्रामीण भागातील) शाळांचा विकास या विषयाबाबत माहितीपूर्ण विवेचन केले. तर कल्याण (पूर्व) येथील आर्य गुरुकुल या शाळेच्या दिव्या बोरसे यांनी शाळांमध्ये/शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर या विषयाबाबत उपस्थितांना माहिती दिली. पर्यावरण दक्षता मंडळाच्या रुपाली शाईवाले यांनी पर्यावरण शाळेविषयी माहिती दिली. योगप्रशिक्षक विणा निमकर, नाट्य प्रशिक्षक रश्मी घुले, आर्ट ऑफ लिव्हींग संस्थेचे निहार भोसले, कृतिका सकपाळ, प्रज्ञा वाघ, राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त मुख्याध्यापक अंकुर आहेर, लोकमतचे प्रशांत माने आणि कल्याण कला आध्यापक संघाचे विनोद शेलकर यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. महापालिका शाळेतील शिक्षक शहाआलम मिर्झा यांनी सूत्रसंचालन केले.