साहित्य क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन काम करण्याची प्रवृत्ती कमी झाली - रवींद्र शोभणे
By सचिन सागरे | Published: February 10, 2024 08:41 PM2024-02-10T20:41:39+5:302024-02-10T20:42:05+5:30
ज्येष्ठ साहित्यिक मंगला गोडबोले यांना जीवनगौरव पुरस्कार;
कल्याण : अलीकडच्या काळात साहित्य क्षेत्रात निष्ठेने स्वतःला झोकून देऊन काम करण्याची प्रवृत्ती फार कमी झाली आहे. एखादा चांगला लेखक कधी विस्मृतीत जाईल हे सांगता येत नाही. आपल्या एखाद्या विरोधकाला आयुष्यातून कसे उठवता येईल यासाठी चंग बांधले जातात हे अत्यंत चुकीचे आहे. तसेच, गटातटाचे राजकारण मराठी साहित्य विश्वातील आपले वाड्मय कलुषित करणारी कृती वाटत असल्याचे मत ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्ष रवींद्र शोभणे यांनी येथे व्यक्त केले.
सार्वजनिक वाचनालय, कल्याणच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्ष समारोप कार्यक्रमानिमित्त ज्येष्ठ साहित्यिका मंगला गोडबोले यांना जीवनगौरव पुरस्काराने ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्ष रवींद्र शोभणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी, कथाकार दि. बा. मोकाशी व कविवर्य माधवानुज पुरस्कार आणि दिवाळी अंक स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ देखील पार पडला. यावेळी, वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, सरचिटणीस भिकू बारस्कर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्राध्यापक होण्याची इच्छा काही कारणास्तव पूर्ण झाली नाही. त्यामुळे, ५० वर्षांपूर्वी लिहायला सुरुवात केली. त्यावेळी, काळाची अनुकुलता खूप लाभली. त्याकाळात आजच्या सारखी प्रसार माध्यमे नव्हती. त्यामुळे, सुसंस्कृत लोकांचे वाचन हे एकमेव करमणुकीचे साधन होते. मराठी मासिकांच्या चलतीचा काळ असल्याने मला मोठ्या प्रमाणात वाचक मिळाल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिका मंगला गोडबोले यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केले.