रिंग रोडच्या तिसऱ्या टप्प्याची निविदा १० ऑक्टोबर रोजी जाहीर होणार!
By मुरलीधर भवार | Published: October 3, 2022 07:01 PM2022-10-03T19:01:07+5:302022-10-03T19:01:22+5:30
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची एमएमआरडीए आयुक्तांसोबत पार पडली बैठक
कल्याण: वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रस्तावित असलेला कल्याण-डोंबिवली महापालिकेचा महत्त्वाकांक्षी रिंग रोड प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याची निविदा १० ऑक्टोबर रोजी जाहीर केली जाणार असल्याची माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. रिंग रोड प्रकल्पासंदर्भात मुंबई एमएमआरडीए कार्यालयात आज बैठक पार पडली. या बैठकीस खासदार शिंदे यांच्यासह एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. श्रीनिवास आणि इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.
रिंग रोडच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामाकरिता ८३ टक्के भूसंपादन पूर्ण करण्यात आले आहे. डोंबिवली मोठा गाव ते कल्याण दुर्गाडी हा तिसरा टप्पा आहे. तिसऱ्या टप्प्याची निविदा १० ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणार आहे. रिंगरोडच्या टप्पा चार ते सातमधील अडथळे दूर करुन त्या कामाला गती दिली जाणार आहे. भूसंपादन पूर्ण करण्यासाठी बीएसयूपी योजनेतील घरांचे वाटप बाधितांना केले जील. टप्पा चार ते सातचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे दुर्गाडी ते टिटवाळा प्रवास अवघ्या १५ मिनिटांत पार करता येणार आहे. टप्पा सात नंतर टिटवाळा ते रुंदे येथील रस्ता पुढे टप्पा आठ थेट कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाला गोवेली येथे जोडला जाणार आहे. कल्याण तळोजा मेट्रो मार्ग १२ ला गती देण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी सल्लागाराची नेमणूक झाली आहे. त्याची निविदा काढून कामाला सुरुवात केली जाईल.
शहाड येथील अरुंद पूलाच्या रुंदीकरणावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. हा पूल १० मीटरचा असून ३० मीटरच्या करण्यासाठी तत्वत: मंजूरी दिली गेली आहे. विठ्ठलवाडी ते शहाड या उन्नत पूलाच्या उभारणीचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे वेळ खाऊ प्रवासातून मुक्तता होणार आहे. डोंबिवली माणकोली पूलाचे काम पूर्ण करुन हा मार्ग एप्रिल २०२३ पर्यंत वाहतूकीसाठी खुला केला जाईल. त्यामुळे डोंबिवली ठाणे हे अंतर पंधरा मिनिटात पार करता येणार आहे असे शिंदे यांनी सांगितले.