येणारा काळ हा होमिओपॅथिकचा : डॉ. जे. पी. शुक्ला
By सचिन सागरे | Published: February 19, 2024 05:12 PM2024-02-19T17:12:20+5:302024-02-19T17:12:41+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पूर्वेकडील जीआरसी हिंदी हायस्कूलमध्ये मोफत होमिओपॅथिक आरोग्य वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कल्याण : कोरोना काळात होमिओपॅथिक उपचार पद्धती आणि औषधोपचार प्रभावी ठरले होते. होमिओपॅथिक औषधांनी आजार मुळासह बरा केला जातो. त्यामुळे येणारा काळ हा होमिओपॅथिकचा काळ असल्याचे मत समाज उद्धार समितीचे सचिव डॉ. जे. पी. शुक्ला यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पूर्वेकडील जीआरसी हिंदी हायस्कूलमध्ये मोफत होमिओपॅथिक आरोग्य वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. शुक्ला बोलत होते. या शिबिरात डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली.
समाज उद्धार समिती संचलित पिसवली गावातील जीआरसी हिंदी शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. समारंभाचे प्रमुख पाहुणे माजी प्राध्यापक डॉ. जय पटेल, समाज उद्धार समितीचे संचालक बबन चौबे, डॉ. धीरज दुबे, डॉ. वृषाली जाधव, डॉ. राम वर्मा, डॉ. विकास यादव, चंद्रमणी चौबे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख हर्षवर्धन पालांडे, राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते डॉ. वंडार पाटील आदींनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
यावेळी मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना संबोधित केले. यादरम्यान समितीने होमिओपॅथिक वैद्यकीय क्षेत्रात ४५ वर्षे सेवा करणारे डॉ. जय पटेल यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले.