गाडी फोडणाऱ्या तिघांचा सत्कार; सोशल मीडियातून मिळवला सदावर्तेंच्या घराचा पत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 09:11 AM2023-10-27T09:11:48+5:302023-10-27T09:14:06+5:30
मराठा आंदोलकांनी गुणरत्न सदावर्तेंची गाडी फोडण्यासाठी सोशल मीडियातून माहिती घेतली.
मुंबई - मराठा आरक्षणाविरोधी विधान करणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर तीव्र संताप व्यक्त करत मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाडीची तोडफोड केली. सदावर्ते यांच्या गाडीची काल सकाळी मराठा आंदोलकांनी तोडफोड केली. याप्रकरणी तिघांवर गुन्हेही दाखल झाले होते. मात्र, ५ हजारांच्या जातमुचलक्यावर तिघांनाही अटी व शर्थींसह जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर, सुटका झालेल्या मराठा आंदोलकांचा डोंबिवलीत मराठा बांधवांकडून सत्कार करण्यात आला आहे. त्यामध्ये, मंगेश साबळे यांनी पुढाकार घेऊन हे कृत्य केल्याचे आता समोर आले आहे.
मराठा आंदोलकांनी गुणरत्न सदावर्तेंची गाडी फोडण्यासाठी सोशल मीडियातून माहिती घेतली. सोशल मीडियातील विविध बातम्या, युट्यूब व्हडिओ आणि सोशल साईटचा वापर करुन त्यांनी सदावर्तेंचा पत्ता शोधला होता. कारण, आरोपी संभाजीनगर जिल्ह्यातील असून मंगेश साबळे हे फुलंब्री तालुक्यातील गेवराई पा. गावचे सरपंच आहेत. यापूर्वीही त्यांनी अनेकदा वेगवेगळी आंदोलनं गेवराई तालुक्यामध्ये केली आहेत. कधी पैशांची उधळण, तर कधी स्वतःची गाडी जाळण्याचा प्रयत्न अशा आंदोलनांमुळे मंगेश साबळे हे प्रकाशझोतात आले होते. आता, सदावर्ते यांच्या घरी जाऊन त्यांच्या वाहनांची तोडफोड केल्यामुळे पुन्हा एकदा साबळे चर्चेत आले आहेत.
वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी मंगेश साबळे, वसंत बनसोडे आणि राजू साठे या तिघांना अटक करण्यात आली होती. या तिघांचा आता मराठा समाजाकडून सत्कार व सन्मान करण्यात येत आहे. बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्तींनी वकील गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड केली होती. सदावर्तेंच्या परळ येथील घराबाहेर त्यांची गाडी उभी होती. तिथेच त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतलं होतं. सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करणारे तिनही तरुण संभाजीनगरचे असल्याची माहिती आहे.
दरम्यान, सदावर्ते यांनी गाडीची तोडफोड प्रकरणासंदर्भात माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली. या प्रकरणी जरांगे पाटील हेच दोषी आहेत, त्यांना अटक करावी, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली होती.